मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून पाच टक्के कपात; अप्पर वैतरणा धरणाने गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:00 AM2024-05-30T10:00:07+5:302024-05-30T10:01:50+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणी शून्य टक्क्यांवर पोहचले आहे.

in mumbai bmc has decided to cut 5 percent water from today read all the information here | मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून पाच टक्के कपात; अप्पर वैतरणा धरणाने गाठला तळ

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून पाच टक्के कपात; अप्पर वैतरणा धरणाने गाठला तळ

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणी शून्य टक्क्यांवर पोहचले आहे. तर, इतर धरणे मिळून जवळपास ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून मुंबई आणि परिसरात महापालिकेकडून पाच टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ५ जूनपासून यात वाढ होऊन ती १० टक्के होणार आहे. 

समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही कपात लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. २९ मे रोजी सातही धरणांत १ लाख २५ हजार ४५२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असून राज्य सरकारने अतिरिक्त २ लाख २८ हजार १४० दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला आहे. पालिका व राज्य सरकारने उपलब्ध केलेला राखीव पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतका आहे. 

यंदा ५.६४ टक्के साठा कमी -

२०२१-२२ या दोन वर्षांत १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. मात्र, २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यात सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. सातही धरणांतील पाणीसाठ्यावर पालिका अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

असा टाळा पाण्याचा अपव्यय! 

१) सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढळल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही.

२) ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

३) वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यांमध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका.

ठाणे, भिवंडीतही १०% कपात! 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे व भिवंडी महापालिकेला पुरवठा करण्यात येतो. मात्र, सातही धरणांतील पाण्याची पातळी खालावल्याने मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. ठाणे व भिवंडी महापालिकेलाही ५ जूनपासून १०% पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

टाक्या भरून वाहू देऊ नका-

सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढळल्यास लगेचच दुरुस्ती करून घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

Web Title: in mumbai bmc has decided to cut 5 percent water from today read all the information here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.