मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम येथे असलेला सी. डी. बर्फीवाला पूल यांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे उर्वरित कामे जलदगतीने करून हा गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी खुली करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी अंधेरी पश्चिमेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती.
परिणामी, बर्फीवाला पूल बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांच्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
महापालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. दोन्ही पूल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम-
गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे जे हसे झाले, त्यावरून प्रशासनाने आता बोध घेण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी सत्यशोधन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नियुक्ती केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकल्पाच्या नियोजनात त्रुटी राहू नयेत म्हणून सत्यशोधन करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या चौकशीचा अहवाल प्रलंबित आहे.
३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर-
गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत दुसऱ्या गर्डरचे सगळे भाग एकत्र करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.