मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका योग्य ती खबरदारी घेत आहे. यंदा मुंबईतील पुराच्या ठिकाणांवरही (फ्लडिंग स्पॉट्स) कीटकनाशक विभाग नजर ठेवणार आहे. या भागांतून फैलावणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये लेप्टोच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
जानेवारी २०२३ ते मे २०२४ पर्यंत ६ लाख ७१ हजार ६४८ उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. उंदीर मारण्यासाठी १७ संस्था कार्यरत असून, एक उंदीर मारण्यासाठी संस्थेला २३ रुपये देण्यात येतात, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या आजाराचा फैलाव उंदरामुळे होतो. त्यामुळे उंदरांचा नायनाट करण्यासाठी विशेष करून रात्रीच्या वेळी मोहीम राबविली जाते. उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या ठिकाणी विषारी गोळ्या ठेवल्या जातात. उंदरांचा प्रजनन-दर कमी करणे, त्यांच्यामुळे होणाऱ्या रोगांना प्रतिबंध व्हावा आणि नासधूस थांबावी यासाठी ‘मूषक नियंत्रण’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. उंदरांपासून होणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, उंदरांचा सुळसुळाट वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
१) किती उंदीर मारले - ६,७१,६४८
२) कार्यरत संस्था - १७
३) एका उंदरासाठी मिळणारे पैसे- २३ रु.
जखम असेल तर लेप्टोचा धोका!
लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल, आदींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसीसचे जीवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
१) एका जोडीपासून वर्षभरात १५ हजार उंदरांची पैदास सस्तन प्राण्यामध्ये मोडणाऱ्या उंदीर किंवा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्यांचे असते.
२) गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर पिल्लांना जन्म देते.
३) एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिल्ले पाच आठवड्यांत प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे १५ हजारपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.