मुंबई :मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत काँक्रीटचे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, अद्याप या कामांत विशेष प्रगती झालेली नसल्याने आता प्रशासनाकडून रस्त्यांच्या कामांसाठी विशेष कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मे अशा आठ महिन्यांमध्ये कामे करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. या कामांसाठी आवश्यक निविदा तसेच वाहतुकीचे ना-हरकत प्रमाणपत्र, अशा गोष्टींची पूर्तता आधीच केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
शहर विभागातील रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदार मिळत नसल्यामुळे पालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. असे असताना कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करणार नाही, असा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शहरापासून दूर असणाऱ्या ‘आरएमसी’ प्लांटमधील काँक्रीटच्या दर्जावर नजर ठेवण्यासाठी पालिकेकडून तज्ज्ञांची, तर रस्त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईची नियुक्ती केली जाणार आहे. यानंतरही रस्त्यांच्या कामाचा दर्जा न राखल्यास कंत्राटदारासह सुपरवायझरवर कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी काँक्रीटच्या रस्त्यांचे आतापर्यंत फक्त ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांना काळी यादीत का टाकू नये, याचे स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी माजी नगरसेवक पालिकेकडे करत आहेत.
फक्त ३० टक्के काम झाले पूर्ण-
१) शहर विभागात फेज-१ मधील ३२३ किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांपैकी केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले आहे.
२) उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी वाढीव दराने काम देण्याची नामुश्की पालिकेवर ओढावली आहे.
३) दुसऱ्या टप्प्यातील कामे देण्यासाठी कंत्राटदारांसोबत वाटाघाटी सुरू आहे.
सर्व रस्त्यांची कोअर टेस्ट होणार -
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी कोअर टेस्ट करण्यात येत आहे. मुंबईतील सर्वच काँक्रीट रस्त्यांची ही टेस्ट केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची हमी मिळणार असल्याने कंत्राटदारांवर दर्जेदार कामे करण्याचे बंधन येणार असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्वमध्ये मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथे दीक्षित मार्ग येथे ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्या शासकीय प्रयोगशाळांमध्ये होणार असून, यासाठी मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून आयआयटी मुंबई काम पाहणार आहे.