रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:38 AM2024-08-01T11:38:48+5:302024-08-01T11:39:23+5:30

मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता ४० बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महापालिका परवानगी देत नाही.

in mumbai bmc notice again to railway hoarding instructions for removal of illegal hoardings | रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना

रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना

मुंबई : मुंबईत सध्या जाहिरात फलकांवरून (होर्डिंग्ज) महापालिका आणि रेल्वेत चांगलीच जुंपली असताना सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवर, टिळक नगर रेल्वे हद्दीत असलेल्या होर्डिंगसंदर्भात एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी मध्य रेल्वे प्रशासन आणि होर्डिंग्ज कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून नियमबाह्य आकाराचे होर्डिंग हटविण्यास सांगितले आहे. होर्डिंग्ज संदर्भात मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या धोरणांचे, तसेच आकाराच्या नियमांचे पालन रेल्वेला करावेच लागेल अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या असताना त्याचे उल्लंघन होत असल्याचे पालिकेला आढळत आहे.  

मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता ४० बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महापालिका परवानगी देत नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील जागांलगत प्रतिबंधित आकाराचे जाहिरात फलक उभारल्याचे आढळून आले आहे. रेल्वे हद्दीतील ४० बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने हटविण्याचे निर्देश मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने पालिकेने दिले आहेत. 

शहरातील कोणतेही होर्डिंग पालिकेने केलेल्या नियमानुसार असणे आवश्यक आहे. त्यामुळे या होर्डिंगबाबत रेल्वे आणि कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. 
- धनाजी हिर्लेकर, सहायक आयुक्त, एल वॉर्ड

बैठकीत खडाजंगी-

१) पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या २२ जुलैला झालेल्या बैठकीत खडाजंगी झाली. फलकांच्या आकारावर नियंत्रण असावे, अशी भूमिका पालिकेने घेतली. 

२) मात्र, आमच्या अधिकारक्षेत्रात आमचे धोरण चालेल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला. अखेर घाटकोपर दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काढलेली नोटीस लागू करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.

३) जाहिरात धोरण येईपर्यंत हीच नोटीस सर्व प्राधिकरणांना लागू असेल, असेही ठरले. बैठकीचे इतिवृत्त सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: in mumbai bmc notice again to railway hoarding instructions for removal of illegal hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.