मुंबई: सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा भव्य फेस्ट 'मल्हार' मोठ्या दिमाखात पार पडला. जवळपास तीन दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यासोबतत वेगवेगळे अनुभवही त्यांना या माध्यमातून मिळतात. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मल्हार फेस्टमध्ये अभिनेत्री श्रिया पिळगांवकर प्रमुख पाहूणी म्हणून उपस्थित राहिली होती. त्यादरम्यान तिने अभिनय क्षेत्रात काम करत असताना तिला आलेले अनुभव कथन केले.
'मल्हार' हा मुंबईमधील सर्वाधिक चर्चेत असणारा एक फेस्टिव्हल आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जातात. 'विवा ला विदा' या संकल्पेनवर आधारित असलेला हा फेस्टिव्हल आहे. याच दरम्यान विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमामध्ये एका कॉनक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकमत या फेस्टिव्हलचा मिडिया पार्टनर आहे.या फेस्टिव्हल दरम्यान श्रिया पिळगांवकरने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला शिवाय त्यांना मार्गदर्शनही केलं.
काय म्हणाली श्रिया पिळगांवकर -
श्रिया पिळगांवकरने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. श्रिया जेष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आहे. 'मल्हार' फेस्टिव्हलमध्ये श्रियाने तिला सिनेइंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं.या कॉनक्लेवेहमध्ये श्रियाने सिनेक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला तेव्हा ती म्हणाली, "मराठीसह हिंदी चित्रपट तसेच ओटीटी माध्यमावर मी काम केलं आहे. या तिन्ही माध्यमांमध्ये मला चांगलेच अनुभव आले. फक्त या क्षेत्रात काम करताना तुमच्याकडे संयम असणं महत्वाचं आहे, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही".
पुढे श्रिया म्हणाली, "या सगळ्या प्रवासात मला माझ्या आई-वडिलांची मोलाची साथ लाभली. त्यांनी कायमच माझं मनोबळ वाढवलं. शिवाय त्यांनी दिलेला एक सल्लाही मला त्यावेळी खूप कामी आला. माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं की कोणतंही काम छोटं मोठं नसतं, काम हे काम असतं हा विचार मनात कायम रुजवा आणि मग पाहा". अशा शब्दांत तिने फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सेंट झेवियर्सच्या या 'मल्हार' फेस्टमध्ये मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं.
या कार्यक्रमात श्रियाने सेंट झेवियर्स महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. सध्या अभिनेत्री ओटीटी माध्यमावर काम करताना दिसते आहे.उपस्थितीने मल्हार फेस्टला चार चाँद लावले.