बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:23 AM2024-08-02T10:23:23+5:302024-08-02T10:24:29+5:30
सीईटी सेलने बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी गेल्या वर्षीपासून स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : नर्सिंग अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाला दीड महिना उलटून गेल्यानंतर अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. या अभ्यासक्रमासाठी गुरुवार १ ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना त्यात १० ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल.
सीईटी सेलने बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी गेल्या वर्षीपासून स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, यंदा ही परीक्षा २८ मे रोजी होऊन त्याचा निकाल १९ जून रोजी जाहीर झाला. मात्र, तेव्हापासून या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. अखेर सीईटीने हे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या प्रवेशाची गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. राज्यामध्ये बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम असलेली पाच सरकारी कॉलेज असून, त्यात एकूण २५० जागा आहेत. राज्यामध्ये नर्सिंगचे फक्त पाच सरकारी कॉलेज असल्याने, त्यांच्यात प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक-
१) विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी - १० ऑगस्टपर्यंत
२) कागदपत्रांची पडताळणी - १ ते १० ऑगस्ट
३) अंतिम गुणवत्ता यादी - १२ ऑगस्ट
विद्यार्थी संख्या यंदा दुप्पट-
१) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नर्सिंगची सीईटी परीक्षा जवळपास दुप्पट विद्यार्थ्यांनी दिली आहे. राज्यभरातून तब्बल ५० हजार २१७ विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असून, यात ३७ हजार ५२४ मुली, तर १२ हजार ६९१ मुलांचा समावेश आहे.
२) गेल्या वर्षी याच अभ्यासक्रमासाठी २७ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा तीन विद्यार्थिनींना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत.