बिल्डिंग बांधा, धूळ नको; महापालिकेकडून बिल्डरांना मार्गदर्शक सूचनांची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:53 AM2024-09-23T09:53:57+5:302024-09-23T09:55:57+5:30
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागताच वायू प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मागील वर्षी पालिकेने २७ मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागताच वायू प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मागील वर्षी पालिकेने २७ मार्गदर्शक सूचना व नियम जारी केले होते. यंदाही पालिका प्रशासन वायू प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी आतापासूनच धूळमुक्तीसाठी अलर्ट मोडवर आले आहे. विकासकांची बांधकामे, तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांच्या ठिकाणी त्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी नुकतीच पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत वातावरणातील बदलांबाबत चर्चा केली. दरवर्षी हिवाळ्यात हवेचा स्तर खालावून वायू प्रदूषणाची पातळी वाढते. बांधकामाच्या ठिकाणची धूळ, धूलिकण, राडारोडा हिवाळ्यात हवेत साचल्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
काय आहेत बांधकाम व्यावसायिकांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे ?
१) एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी पत्र्यांचे किंवा कापडांचे आच्छादन असावे.
२) स्प्रिंकलर यंत्रणा असावी. धूळ उडू नये, म्हणून दिवसातून किमान चार ते पाच वेळा पाण्याची फवारणी करावी.
३) प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक. बांधकामांशी संबंधित वाहनाची पीयूसी चाचणी करावी.
४) सर्व बांधकामांच्या ठिकाणी वायू प्रदूषण किती आहे, याची नोंद दाखविणारे मॉनिटर लावणे आवश्यक आहे. पालिकेला आवश्यक तेव्हा त्यावरील नोंदी उपलब्ध करून द्याव्यात .
४) एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमआयडीसी, तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको या यंत्रणांनी बांधकामाच्या ठिकाणी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
५) एमआयडीसी परिसरातील बीपीसीएल, एचपीसीएल आणि इतर रिफायनरींच्या प्रदूषणावर नजर ठेवण्याची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) असणार आहे.
६) पुढील एका महिन्यासाठी रोज प्रदूषणाची नोंद करून त्यांच्यावर कारवाई 'एमपीसीबी'कडून करण्यात येईल. ही माहिती शहर व उपनगरे यांच्या अतिरिक्त आयुक्तांनाही असणार आहे.
७) डम्पिंग ग्राउंडवर किंवा उघड्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा पालिका क्षेत्रात किंवा हद्दीमध्ये जाळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.