Join us

पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा; उंच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना पाणीसुख; काही भागात ठणठणाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 9:33 AM

भारताची आर्थिक राजधानी, आंतरराष्ट्रीय शहर अशी बिरुदावली मुंबई महानगराच्या पुढेमागे लावली जाते.

मुंबई : भारताची आर्थिक राजधानी, आंतरराष्ट्रीय शहर अशी बिरुदावली मुंबई महानगराच्या पुढेमागे लावली जाते. त्यानुसार या शहराचे व्यवस्थापन असायला हवे. मात्र, ते जागतिक दर्जाचे नाही. जलव्यवस्थापनातूनच हे अधोरेखित होते. गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने यंदा जूनच्या सुरूवातीपासूनच दहा टक्के पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. अशावेळी पाण्याच्या समस्येने डोके वर न काढले तरच नवल. 

शहरात उंच टॉवरमध्ये राहणाऱ्यांना पाणीसुख, मात्र त्याचवेळी काही भागात पाणी वरच्या मजल्यावर चढत नाही, शेवटच्या टोकाकडील वस्त्यांमध्ये अशीच तक्रार ऐकू येते. काही ठिकाणी पाण्याच्या वेळा विचित्र आहेत. त्यामुळे काही ठिकाणच्या रहिवाशांना रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर उठून पाणी भरावे लागते. काही ठिकाणी पाण्याच्या जोडण्या आहेत, पण पाणीपुरवठा नाही, अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागते, तर काही ठिकाणी टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.

१० टक्के नावाला, पण...

पाणी कपातीचा १० टक्के  हा आकडा केवळ नावाला आहे. बहुतांशी ठिकाणी पाणी कपातीचे प्रमाण वेगवेगळे आहे. झोपड्यांच्या परिसरात पाणी कपातीचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. शिवाय पाण्याचा दाब कमी केला जातो. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचत नाही. - सीताराम शेलार, समन्वयक, पाणी हक्क समिती

नळ जोडण्या दिल्या, पण...  

१)  पाणी हक्क समितीच्या प्रयत्नाने मंडाला येथे २५० नळ जोडण्या मिळाल्या. पाणी आले तरी गढूळ असते. मालाड येथील अंबुजवाडीतही ४५० जोडण्या मिळवून दिल्या आहेत. मात्र येथेही पाणी येत नाही. 

२)  मानखुर्दमधील सह्याद्री नगरच्या वरच्या भागात पाणी चढत नाही. याबद्दल खूप तक्रारी आहेत. मात्र पाणी कपात असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. परिणामी आम्हाला खालून पाणी भरून वर न्यावे लागते, असे स्थानिकांनी सांगितले.

जुहू कोळीवाड्यात रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण-

१)  सांताक्रूझ पश्चिम येथील जुहू कोळीवाड्यात रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. येथील रहिवाशांना पाण्यासाठी बोअरवेलवर धाव घेत दिवसभर रांगा लावून पाणी मिळवावे लागते. पालिकेचे पिण्याचे पाणी गढूळ असल्याने त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. 

२)  जास्तीचे पैसे मोजून रहिवासी पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही पालिका अधिकारी अमित पाटील यांची भेट घेतली. त्यांना आमच्या समस्या सांगितल्या आहेत. त्यांनी पाण्यासाठी टँकर पाठवतो, असे सांगितले. मात्र, अद्याप पाणी आलेले नाही. पालिकेचे पाण्याचे बिल भरूनसुद्धा आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही, अशी खंत संताना डिसोजा यांनी व्यक्त केली.

जोगेश्वरीत पाण्यासाठी रहिवाशांचे आंदोलन-

१)  जोगेश्वरीच्या गुलशननगर परिसरात १५ दिवसांपासून पाणी येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या विरोधात दोन दिवसांपूर्वी त्यांनी आंदोलनही केले. 

२) आम्हाला पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करावी लागत असून अनेकांनी घरात धुणी-भांडी केलेली नाहीत तसेच आठवडाभर आंघोळही न केलेले लोक तुम्हाला दिसतील. त्याच परिस्थितीत ते कामावर आणि मुले शाळेत जातात. मात्र, पालिकेकडून फक्त बघतो, करतो अशी उत्तर येत आहेत, असल्याचे स्थानिक रहिवाशी जगदीश शर्मा यांनी सांगितले. 

बोरिवलीत अर्धा तासच पाणी-

१)  बोरिवलीच्या गोराई १, २ आणि ३ याबरोबरच चारकोप येथे अर्धा तासच पाणी येत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. 

२) पाणी कपात १० टक्के असल्याचे पालिकने जाहीर केले असले, तरी ८० टक्के पाणीकपात असल्याची टीका माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी केली. गोराईला १० टँकर पाणी पुरविण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. प्रत्यक्षात पाच ते सहा टँकर इतकाच पाणीपुरवठा होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

म्हाडा कॉलनीत कमी दाबाने पाणी -

दहा टक्के पाणी कपात असल्याने मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत दुपारी एक ते पाच पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. तशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. त्यानुसार, आधीच पाणी भरून ठेवत आहोत. मात्र, काहीजण मोटर लावत असल्याने पाणी आणखी कमी दाबाने येत आहे, असे येथील रहिवासी रवी नाईक यांनी सांगितले.

पाण्याची वेळ किमान १० मिनिटांनी कमी-

विक्रोळी, सूर्यनगर, राहुलनगर, पार्क साईट हा भाग डोंगराळ आहे. त्यामुळे वरच्या भागात पाणी जास्त दाबाने चढत नाही. कपातीमुळे पाण्याची वेळ १० मिनिटांनी कमी झाली, असे राहुलनगर येथील रहिवासी आनंद सूर्यवंशी यांनी सांगितले. पाणी कपात असली की सार्वजनिक नळावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होते. 

बीडीडी चाळीत अनेक घरांना पाणी मिळत नाही -

१) ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या भागात पाणी कमी दाबाने सोडले जाते. चाळीतील दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरील अनेक घरांना पाणी मिळत नाही. 

२) पाण्याची नियोजित वेळ ३ वाजताची आहे. मात्र कधी २ वाजताच पाणी सोडले जाते. तर कधी ३:३० किंवा ४ वाजता पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी कधी येईल, याची वाट पाहावी लागते, याकडे दीपक बागवे यांनी लक्ष वेधले.

वाडीया इस्टेट परिसरात पाण्याचा दाब कमी-

१)  कुर्ला पश्चिमेकडील वाडीया इस्टेट परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पाण्याची अडचण आहे. इमारतीचा तळमजला वगळला तर वरच्या मजल्यावरील रहिवाशांना पाणीच मिळत नाही.

२) पाणी मिळाले तरी पाण्याचा दाब कमी असतो. रात्री दोननंतर येणारे पाणीही कमी दाबाने येत असल्याने रात्री जागून पाणी भरावे लागते. जेथे कमी दाबाने पाणी येते तिथे बूस्टर पंप लावले जात आहेत. 

३)  बूस्टर पंप लावल्याने पाणी खेचून घेतले जाते. सुरूवातीच्या लोकांना पाणी मिळते. त्यामुळे ज्यांना कमी पाणी मिळत होते, त्यांनाही पाणी मिळत नाही. 

वांद्रे पूर्वमध्ये पाण्यासाठी जागरण-

१) उपनगरात खार, वांद्रे आणि सांताक्रूझ परिसरात पालिकेच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी वणवण सुरू आहे. येथे मध्यरात्री पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे. वांद्रे पूर्व येथील सिद्धार्थ नगर, ज्ञानेश्वर नगर, भारत नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. खार, सांताक्रूझ परिसरात सुद्धा पालिकेचे पाणी मिळत नाही. 

२)  येथील परिसरात पालिकेकडून जुन्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दूषित आणि गढूळ पाणी येते. येथे झोपडपट्टी परिसर जास्त असल्याने नागरिक मध्यरात्री पाण्यासाठी वणवण करत आहेत.

मालाडमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा-

१) मालाड पश्चिमच्या राठोडी परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पावसाळा सुरू झाला असून त्यात अशा प्रकारे आरोग्यास हानीकारक असलेले पाणी पिल्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. 

२) येथे गटाराचे काम सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळेच हा प्रकार होत असल्याचा आम्हाला संशय असून याबाबत पालिकेने लक्ष घालावे अशी विनंती आहे, असे मत स्थानिक रहिवाशी विवेक सिंह यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबईपाणी टंचाईपाणीकपात