गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुहूतील उच्चभ्रू वस्तीतील एका घरात चोर शिरला असताना तेथील महिलेने अजिबात न घाबरता प्रसंगावधान दाखवून चोरी रोखण्यात यश मिळवल्याचे समोर आले आहे. ही महिला मानसोपचार तज्ज्ञ असून यावेळी झालेल्या धावपळीत तिच्या डोक्याला दुखापतही झाली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी २७ ते ३० वयोगटातील अनोळखी चोरावर गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. श्रुती मनकताला (४७) असे या महिलेचे नाव असून जुहू पोस्ट ऑफिस समोरील सिनिफ इमारतीमध्ये त्या राहतात. त्यांच्या घरात डागडुजीचे काम सुरू असल्याने त्या दुसऱ्या मजल्यावरील घरात भाडेतत्त्वावर राहत आहेत.
२५ ऑगस्ट रोजी त्या मावस बहीण डॉ. सुनंदा आनंद यांच्यासोबत एका कॉन्फरन्सवरून घरी परतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पहाटे ३:१५ च्या सुमारास डॉ. श्रुती मेडिटेशन करण्यासाठी उठल्या. तेव्हा त्यांना बाहेरूनच खोलीमध्ये टेबलजवळ एक अनोळखी व्यक्ती पाठमोरा दिसला. डॉक्टरने चोर-चोर म्हणून ओरडायला सुरुवात केल्याने तो अलर्ट झाला.
यावेळी डॉ. श्रुती न घाबरता त्याच्या दिशेने खोलीच्या दरवाजाजवळ धावत गेल्या असता चोराने खोलीचा दरवाजा जोरात बंद केला. तेव्हा दरवाजा लागून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांचा आवाज ऐकून त्यांची मावस बहीणही जागी झाली. त्यामुळे चोराने खोलीच्या खिडकीतून बाहेर उडी मारत तेथून पोबारा केला. या घटनेनंतर डॉ. श्रुती यांनी उपचारानंतर जुहू पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोर बिनधास्त फिरत होता-
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोर खिडकीतून पळून गेल्यानंतर शेजारच्या दोन इमारतींमध्ये बिनधास्त फिरत होता. तिसऱ्या इमारतीमधून तर तो २० मिनिटांनी बाहेर पडला. त्यामुळे या इमारतींची आधीच रेकी केल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने जुहू पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मी कराटेमध्ये ग्रीन बेल्ट आहे. मात्र खरे धाडस हे बाह्य तंत्रात किंवा कोणत्याही गॅजेट्समध्ये नसून गरजेच्या वेळी आपण ते नेमके कसे वापरतो यात आहे. मी चोराशी दोन हात करायला न जाता आरडा ओरड केली. त्यामुळे चोराच्याच मनात भीती निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावर मी घाबरल्याचे त्याला दाखवले नाही. अन्यथा त्याने मला चाकूच्या धाकाने लुबाडले असते किंवा माझ्या जीवावरही बेतले असते. -डॉ. श्रुती मनकताला, मानसोपचार तज्ज्ञ