Join us  

महापालिका उभारणार कर्करोग रुग्णालय, कंत्राटदाराची निवड; २१३ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:04 AM

कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत.

मुंबई : कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. हे १६५ खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, तीन वर्षांत रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी २१३ काेटी रुपये खर्च येणार आहे.

परळ आणि खारघर येथील टाटा रुग्णालयात देशातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मुंबई महानगरपालिकेने नायर रुग्णालयात कर्करोगावरील उपचार सुरू केले आहेत; परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही व्यवस्था फारच अपुरी ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या जवळील आर. के. पेटकर मार्गावर आरक्षित २,५२५ वर्गमीटर भूखंडावर कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला होता. 

महानगरपालिकेच्या वास्तुविशारदांनी रुग्णालय उभारण्यासंदर्भातील आराखडा तयार केल्यानंतर बांधकामासाठी निविदा काढल्या होत्या. यात कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे.

रुग्णालय कसे असेल?

१) कर्करोग रुग्णालयाची इमारत ही दोन तळघरांसह १० मजली असेल. जवळपास १३ हजार वर्गमीटर बांधकाम करण्यात येणार आहे.

२) इमारतीच्या एक ते आठ मजल्यांवर कर्करोगासंदर्भातील उपचारांच्या सुविधा असतील. नवव्या आणि दहाव्या मजल्यावर अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था असेल.

सुविधा काय?

रुग्णालयामध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, अतिदक्षता विभाग, अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा असणार आहेत. यामध्ये रेडिओथेरेपीसाठी दोन स्वतंत्र कक्ष, १२ बाह्यरुग्ण कक्ष, विविध प्रकारच्या पाच प्रयोगशाळा, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्स, सभागृह, रक्तपेढी, विलगीकरण कक्ष, रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहॉस्पिटलकर्करोग