मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:23 AM2024-04-18T10:23:06+5:302024-04-18T10:36:33+5:30
कार्यक्रमांना लावली हजेरी.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच आलेल्या रामनवमीचा मुहूर्त साधत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावत मतदारांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला.
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची पहिली रामनवमी असल्याने जनसामान्यांमध्ये विशेष उत्साह होता. मुंबई शहर व उपनगरांत त्या निमित्ताने रामरक्षा स्तोत्रपठण, रामजप, सत्यनारायण पूजा, पालखी, भजन-कीर्तन, अन्नदान अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही यात हिरिरीने सहभागी होत मतदारांशी संपर्क साधला.
मुंबई उत्तर पूर्व -
मुंबई उत्तर पूर्वमध्ये विविध मंदिर, संस्थांच्या धार्मिक उत्सवात महायुती-मविआचे उमेदवार व्यस्त होते. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर, मानखुर्द येथे शोभायात्रा, यज्ञ कार्यक्रमात हजेरी लावली. उद्धवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मुलुंडच्या चंदन बाग येथे आयोजिलेल्या होमहवनसह भांडुप, कांजूर, विक्रोळी पूर्व, घाटकोपर भागात आयोजिलेल्या होमहवन आणि महापूजेला सहभागी झालेले दिसून आले. कुठे उमेदवाराने खांद्यावर पालखी घेतली, तर कुठे उमेदवाराकडून अन्नदान करण्यात आलेले दिसले.
मुंबई उत्तर पश्चिम -
उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतदारसंघात ५५ ठिकाणी भेटी दिल्या. शोभायात्रेत सहभाग घेतला. उद्धवसेनेचे दिंडोशी येथील आमदार सुनील प्रभू यांनी मतदारसंघात शोभायात्रा, महाभंडारा आणि पूजेत सहभाग घेतला. शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व येथील मतदारसंघात १२ ठिकाणी भेटी दिल्या. भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी सायंकाळी दोन शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला. जुहूच्या इस्कॉन मंदिरात आणि अडमर मठ येथील पूजेत ते सहभागी झाले. वर्सोवाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मतदारसंघात २५ ठिकाणी भेटी दिल्या. महाआरती आणि पूजेत सहभाग घेतला.
मुंबई उत्तर मध्य-
महायुतीत भाजपसाठी राखीव असलेल्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढून शिंदे सेनेने शक्तिप्रदर्शन केले. जय श्रीरामच्या घोषणा देत हिंदू, मराठी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांचा भरणा असलेल्या वांद्रे रिक्लेमेशन, खेरवाडी, निर्मलनगर खार, मराठा कॉलनी, प्रभात कॉलनी सांताक्रुझ, गोळीबार, विलेपार्ले या परिसरातच ही शोभायात्रा काढण्यात आली. पक्षाचे अस्तित्व टिकविताना भाजपकडून संयुक्त कोणताच कार्यक्रम दिला जात नसल्याने शिंदे गटाकडून कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई दक्षिण मध्य-
मुंबई दक्षिण मध्यमधील उद्धवसेनेचे अनिल देसाई आणि शिंदेसेनेचे राहुल शेवाळे या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील विविध राम मंदिरांना भेटी दिल्या, तसेच या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून प्रचाराचाही संधीही साधली. माहीम, चेंबूर, ट्रॉम्बे, वडाळा भागातील मंदिरांना भेटी देऊन या उमेदवारांनी रामाचे दर्शन घेतले. राहुल शेवाळे यांनी अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेतले. श्रीराम मंदिरातून पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाण घेऊन आले. हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर ठेवून अभिवादन केले. अनिल देसाई यांनीही मतदारसंघातील विविध राम मंदिरे आणि कालीमाता मंदिरांना भेटी दिल्या.
मुंबई दक्षिण -
मुंबई दक्षिणमध्ये उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी गिरगाव येथील झावबावाडीतील राम मंदिर, काॅटनग्रीन येथील राम मंदिर आणि श्री रामचंद्रजी टेंपल ट्रस्ट आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला सहकुटुंब भेट देत दर्शन घेतले. महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणारे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गिरगाव खेतवाडी येथे श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परळ येथील रोहिदास समाज पंचायत समिती संघाच्या रामनवमी उत्सवाला भेट दिली.