Join us  

केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:05 AM

वृद्धाच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने हजारो रुपयांची चोरी करत पळ काढला.

मुंबई : वृद्धाच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने हजारो रुपयांची चोरी करत पळ काढला. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार दिनेशचंद्र रानडेरिया (वय ८४) हे अंधेरी पश्चिमेतील गिल्बर्ट हिल रोड परिसरातील इमारतीत पत्नी उषा आणि मुलासोबत राहतात. त्यांच्याकडे घरकाम करायला एक महिला आहे. मात्र, त्यांच्या पत्नीच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांनी तिची शुश्रूषा करण्यासाठी सुधा दास हिला कामावर ठेवले. तिने १२ जूनपासून त्यांच्याकडे सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान काम करायला सुरुवात केली. या कालावधीत त्यांच्या घरातून ५०० रुपयांची नोट गायब झाली होती. त्यावेळी रानडेरिया यांना शंका आली, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 

तक्रारदाराला शिवीगाळ -

१) रानडेरिया यांनी खर्चासाठी बँकेतून २० हजार रुपये काढले. त्यातील दोन हजार काढून उर्वरित रक्कम कपाटात ठेवली. नंतर दळण आणण्यासाठी ते घराबाहेर गेले. 

२) कपाटाला कुलूप लावायला विसरले. तेव्हा सुधा आणि उषा या घरात होत्या. ते घरी येईपर्यंत सुधा निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी कपाटातील पैसे पाहिले असता त्यातील १८ हजार नव्हते. 

३) सुधाकडे त्यांनी दुसऱ्या दिवशी विचारणा केली. मात्र, तिने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिने चोरी केल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

टॅग्स :मुंबईअंधेरीगुन्हेगारीपोलिसचोरी