लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे तसेच समुद्री जीवांचे अस्तित्व राज्याच्या मत्स्य विकास विभागाच्या पाहणीत आढळले आहे. त्यामुळे गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनावेळी दंश करण्याची शक्यता असलेले अपायकारक मासे मत्स्य विभागाने केलेल्या ‘ट्रायल नेटिंग’ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळले, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून देण्यात आली. राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे अपायकारक माशांच्या अस्तित्वाची चाचपणी केली असता त्यात ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फिश, शिंगटी, ब्लू जेली फिश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळले. नेटिंगमध्ये पाकट (स्टिंग रे) हा मासा आढळला. त्याचबरोबर जेली फीश, ब्लू जेली फिश हे मासेही आढळले. त्यामुळे विसर्जनावेळी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथमोपचार काय?
१) ‘स्टिंग रे’ माशाच्या दंशामुळे दंशाच्या जागी आग होते किंवा चटके बसल्यासारखे जाणवते.
२) जेली फिशचा संसर्ग झाल्यास अंगाला मोठ्या प्रमाणावर खाज सुटते.
३) जेली फिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावी.
४) जखम चोळली जाणार नाही किंवा चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावी.
५) मत्स्यदंशाची जखम निर्जंतुक पाण्याने धुऊन काढावी.
६) जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.
पालिका सज्ज-
नागरिकांनी समुद्रामध्ये जाताना उघड्या अंगाने जाऊ नये. तसेच पाण्यामध्ये जावयाचे असल्यास ‘गमबूट’ वापरावेत आणि लहान मुलांना पाण्यामध्ये जाऊ देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शिवाय गणेश मूर्ती विसर्जनावेळी मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात महापालिकेचा वैद्यकीय कक्ष सज्ज आणि १०८ ही रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे.