महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा ‘वॉच’; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ४,६२६ कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 09:33 AM2024-09-30T09:33:19+5:302024-09-30T09:36:14+5:30
मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपनगरी लोकलमधील महिलांच्या ७७१ डब्यांमध्ये चार हजार ६२६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपनगरी लोकलमधील महिलांच्या ७७१ डब्यांमध्ये चार हजार ६२६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) हे काम करण्यात आले असून, प्रत्येक महिला डब्यात चार ते आठ कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ असणार आहे. लोकल सोबतच वंदे भारत ट्रेन, डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट, मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या एकूण ४५६ डब्यांमध्येही दोन हजार ८२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना लोकलमधील गार्डशी संवाद साधता यावा, यासाठी डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येत आहे. जवळपास ९० टक्क्यांहून अधिक म्हणजेच १३५ महिला डब्यांमध्ये ही यंत्रणा बसविली आहे. तर, उर्वरित डब्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. या यंत्रणेमुळे यंत्रावरील बटण दाबून महिलांना अवघ्या काही सेकंदात गार्डशी संवाद साधता येत आहे. त्याचबरोबर घटनेचे गांभीर्य ओळखून आवश्यकतेनुसार तातडीने लोकल थांबवून प्रवाशांना मदत करता येणार आहे. यात कॉल रेकॉर्डिंगची सुविधाही आहे. यामुळे ही यंत्रणा कायदेशीर तपासात महत्त्वाची ठरणार आहे.
१) मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एकूण लोकल-१७०
२) महिलांसाठीचे डबे- ७७१
३) लोकलमधील सीसीटीव्ही - ४,६२६
४) ईएमयु, डीएमयु, मेमु, मेल एक्स्प्रेस डब्यांतील सीसीटीव्ही- २,८२०
५) टॉकबॅक सिस्टीम असलेले डबे - १३५
२४ तास देखरेख-
१) मध्ये रेल्वेच्या १२ डब्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या दर्जाच्या डब्यांमध्ये एकूण सहा कंपार्टमेंट महिलांसाठी राखीव आहेत.
२) महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेषत: रात्रीच्या वेळी महिला डब्यांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या डब्यांमध्ये महाराष्ट्र रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात.
३) आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक सारख्या यंत्रणा बसविण्यात येत आहेत. ‘सीसीटीव्ही’मुळे २४ तास पाळत ठेवणे शक्य असून, हे रेकॉर्डिंग ३० दिवस जतन करता येणार आहे.