लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवात कोस्टल रोड २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील सिमेंटने भरलेल्या पॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या या प्रकल्पाच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी बोगद्यातील गळती व आता सिमेंटच्या पॅचबाबत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत चांगलेच ट्रोलिंग सुरू केल्याचे चित्र आहे.
कोस्टल रोडचे आतापर्यंत ९१ टक्के काम झाले आहे. या मार्गाची बिंदुमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिणवाहिनी मार्गिका ११ मार्चपासून खुली करण्यात आली आहे. तसेच मरिन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शन ही उत्तरवाहिनी मार्गिका १० जूनला खुली करण्यात आली आहे. हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंतची उत्तर दिशेने जाणारी ३.५ कि.मी लांबीची मार्गिका ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता रस्त्यावरील भेगा काँक्रीटने भरल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांकडून रातोरात काँक्रीटने हे पॅच भरल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, १३ हजार कोटी खर्चुन तयार केलेल्या रस्त्यावर ही समस्या असेल, तर शहरांतील रस्त्याची काय अवस्था होणार, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहेत. दरम्यान यासाठी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
वरळी ते वांद्रे सी लिंक सुरू होणार?
मरिन ड्राइव्ह ते वरळी आणि वांदे सी लिकपर्यंत व त्यापुढे वेगवान प्रवासासाठी पालिका प्रयत्नशील आहे. वांद्रे सी लिकपासून ते मरिन ड्राइव्हला जाणारी दक्षिण वाहिनी १५ सप्टेंबरपर्यंत खुली केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.