मुंबई : लोकलच्या गर्दीवर उतारा काढण्यात यावा म्हणून रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाला कित्येक वेळा उपाययोजना सुचवल्या, तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यात भर म्हणून की काय ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी हाती घेतलेल्या ब्लॉकमुळे लोकलला लागलेला लेटमार्क अद्याप कायम आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटना संतापल्या असून, या प्रश्नी महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे टिटवाळा आणि बदलापूरहून १५ डब्यांच्या लोकल सोडण्यात याव्यात. कारण या मार्गावर प्रवासी संख्या खूप असून, डोंबिवली, दिवा, मुंब्रा येथे रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
पंधरा डब्यांच्या लोकल सोडल्या तर गर्दी कमी होईल. पंधरा डब्यांच्या दोन लोकल आहेत. यातील एक लोकल देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. ती सुरू करण्यावर भर देण्यात यावा, याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधणार आहोत. एसी लोकलचे भाडे कमी करण्यात यावे आणि लोकलची गर्दी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी बुधवारी महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहेत. नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ
१) कळवा व मुंब्रा स्थानकात सकाळ-संध्याकाळ निवडक जलद लोकलना थांबा द्या.
२) सकाळ / संध्याकाळच्या वेळात ठाणे-डोंबिवलीदरम्यान लोकलच्या जास्तीत जास्त शटल फेऱ्या चालवा. • बदलापूर / अंबरनाथ / टिटवाळा ते ठाणे (कल्याण-ठाणेदरम्यान तिसऱ्या कॉरिडॉरवरून जलद) लोकल फेऱ्या चालवा.
३) कल्याण टिटवाळा,बदलापूरदरम्यानच्या फलाटांची लांबी वाढवून १५ डब्यांच्या गाड्या चालवा.
...तर गर्दी होणार कमी
रोहा व पेण येथून सकाळी दिवा स्थानकात येणाऱ्या ३ मेमू गाड्या दीर्घकाळ थांबून मग परतीच्या प्रवासासाठी सुटतात. या कालावधीत या प्रत्येक गाडीच्या दिवा ते ठाणे फलाट ८ व तिसरा कॉरिडॉर / पारसिक टनेलमधून पुन्हा दिवा, अशा ३ फेऱ्या चालवल्यास लोकलमधील गर्दी कमी व्हायला मदत होईल.