चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:49 AM2024-06-25T10:49:39+5:302024-06-25T10:53:45+5:30
चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण दलाची जमीन घेण्याच्या मोबदल्यात मुंबई महापालिका संरक्षण दलाला ११ कोटी रुपये देणार आहे.
नेमकी किती रक्कम द्यायची, असा पेच निर्माण झाल्याने लिंक रोडच्या विस्तारीकरणात अडचण निर्माण झाली होती. पुलावरील मार्गिका वाढवण्यासाठी अतिरिक्त जमिनीची गरज होती. मात्र जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेवरून संरक्षण आणि पालिकेत तोडगा निघत नसल्याने लिंक रोडच्या पहिल्या टप्प्यातील विस्ताराचे काम रखडले होते.
टप्प्याटप्प्यात होणार कामकाज-
लिंक रोडचा कपाडियानगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वाकोला जंक्शनपर्यंत विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ आणि बीकेसी, तर दुसऱ्या टप्प्यात भारत डायमंड बोर्ज ते वाकोला जंक्शन असा विस्तार होणार आहे.
आता तोडगा निघाल्याने महापालिकेनीही रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मोबदल्याच्या रकमेवरून दोनी बाजूंकडून बराच काळ सहमती मिळत नव्हती. संरक्षण दलाने २७ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र रेडीरेकनर दरानुसार भाव देऊ, अशी पालिकेची भूमिका होती. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ बराच काळ सुरू होते.
लिंक रोडच्या ३.८ किमी टप्प्यातील विस्तारासाठी ४१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष २०१६ पासून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वर्ष २०१९ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र हा मुहूर्त काही पालिकेला साधता आलेला नाही. आता ११ कोटी रुपये आम्ही तुम्हाला देतो, उर्वरित रकमेचे अंतिम करार होताना बघू, अशी विनंती पालिकेने संरक्षण दलाला केल्याचे समजते.
पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत सुसाट प्रवास -
१) लिंक रोडच्या माध्यमातून चेंबूर येथून अवघ्या काही मिनिटांत बीकेसीच्या दिशेने येणे शक्य होते; मात्र लिंक रोड ज्या ठिकाणी संपतो, त्यापुढे कुर्ला-सीएसटी रोड ते बीकेसीपर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.
२) त्यामुळे लिंक रोडवरून सुरू होणाऱ्या वेगवान प्रवास करता येत नाही. बीकेसी आणि पुढे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत प्रवास सुसाट व्हावा, यासाठी लिंक रोडच्या विस्ताराचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.