लोकमत न्यूज नेटवर्क,मनीषा म्हात्रे, मुंबई : मॅडम, साहेब मीटिंगमध्ये आहेत. मी त्यांचा ऑपरेटर, ड्रायव्हर बोलतोय... असाच काहीसा प्रतिसाद गेल्या दीड महिन्यापासून मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यांतून नागरिकांना मिळत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक चांगला निर्णय घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नवीन मोबाइल क्रमांक दिले आहेत. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच या मोबाइलचा विसर पडला आहे. त्यांचा मोबाइल ऑपरेटर किंवा त्यांचे वाहन चालक हाताळतात किंवा काही पोलीस अधिकारी, अंमलदार मोबाइल आडोशाला ठेवून आलेला कॉल समजलाच नसल्याचा बनाव करतात, अशा तक्रारी आहेत.
मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीसह नागरिकांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यातील संपर्क क्रमांकासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांचे खासगी क्रमांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, खासगी क्रमांकासह लँडलाइन क्रमांकही अनेक जण उचलत नव्हते. पुन्हा नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांचा क्रमांक तत्काळ अपडेट होत नसल्याने अडचणीत भर पडायची. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि नागरिक यांच्यातील संवादाचा दुवा म्हणून प्रशासनाने पोलीस ठाण्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या क्रमांकाची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. मात्र, या मोबाइलकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र मुंबईतील बहुसंख्य पोलिस ठाण्यांत आहे.
मोबाइल ऑपरेटर, वाहन चालकाकडे सोपवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक कामात व्यग्र असतात. यामुळे चालक, ऑपरेटरचीही डोकेदुखी वाढली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नवीन क्रमांकावरील अशा प्रतिसादामुळे महत्त्वाचा कॉल मिस झाला तर? काय होईल, असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मुंबई पोलिस दलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दत्ता नलावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गैरसोय होऊ नये म्हणून...
१) एका वरिष्ठ निरीक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या सोयीसाठी दीड महिन्यापूर्वी नवा मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.
२) तो मोबाइल वरिष्ठ निरीक्षकाकडेच असणे बंधनकारक आहे, पण रात्री गैरसोय होऊ नये, म्हणून तो नाइटच्या पोलीस निरीक्षकाकडे ठेवला जातो.
३) खूपच गडबड असेल, तर मोबाइल ऑपरेटरकडे दिला जात असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
...अन् नाराजीचा सूर
पोलीस ठाण्यातील कर्मचारी किंवा तपास अधिकाऱ्यांकडून हवे तसे सहकार्य मिळाले नाही, तर तक्रारदार पोलीस ठाण्याचा प्रमुख असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेतो, परंतु त्यांचेही सहकार्य मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात.
मॅडम शॉपिंगमध्ये आहेत...
पश्चिम उपनगरातील एका महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नंबरवर कॉल करताच, त्यांच्या चालकाने फोन घेतला. एका महत्त्वाच्या घटनेच्या माहितीसाठी दोन ते तीन वेळा कॉल करताच, मॅडम शॉपिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
...तर काही जण कॉलच घेत नाही
बरेच अधिकारी तो मोबाइल बाजूला ठेवून कॉलच घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत प्रत्यक्ष भेटीत त्यांना विचारताच, कुठल्या नंबरवर तुम्ही कॉल केला होता? असा प्रश्न त्यांच्याकडून येतो. तो नंबर सर्वांसाठी आहे ना. त्यामुळे त्याकडे लक्ष जात नाही, असे कारण देत वैयक्तिक क्रमांकावर कॉल करा, अस ते सांगतात.