छोट्याशा या घरात, बाप्पा सजेल महाली! मुंबईकरांची सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 09:27 AM2024-09-02T09:27:48+5:302024-09-02T09:29:44+5:30

आपल्या छोट्याशा घरात लाडक्या बाप्पासाठी सुंदर असा महाल उभारावा, असं सध्या प्रत्येकाच्या मनात सुरू आहे आणि त्यासाठीच लालबागमधील रेडिमेड मखरांच्या बाजारात लगबग वाढलेली दिसते आहे.

in mumbai citizens flock to shop on holidays special demand for lakshmi asana and eco friendly makhar | छोट्याशा या घरात, बाप्पा सजेल महाली! मुंबईकरांची सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी झुंबड

छोट्याशा या घरात, बाप्पा सजेल महाली! मुंबईकरांची सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्या छोट्याशा घरात लाडक्या बाप्पासाठी सुंदर असा महाल उभारावा, असं सध्या प्रत्येकाच्या मनात सुरू आहे आणि त्यासाठीच लालबागमधील रेडिमेड मखरांच्या बाजारात लगबग वाढलेली दिसते आहे. बाजारात विविध आकारांचे आणि प्रकारांचे आकर्षक मखर पाहताना गणरायाला यात बसवायचं की त्यात, अशा विचारांत दंग गणेशभक्तांच्या खरेदीच्या उत्साहाला पारावार राहिलेला नाही.

विठ्ठल आसन, महालक्ष्मी आसन, राज आसन, सूर्य आसन, एकवीरा आसन, राममंदिर,  राजमहल या मखरांसोबतच काहींमध्ये तर चक्क वॉटरफॉलदेखील पाहायला मिळत आहेत. यात कोल्हापुरी शालू आणि महालक्ष्मीच्या मुखवट्याने बनविलेल्या लक्षी आसनाला जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विशेष म्हणजे इको फ्रेंडली मखरही बाजारात पाहायला मिळत असून, त्यात भाताच्या लोंब्या, झाडांची सुकलेली पाने, नारळाच्या झावळ्या आणि नारळाच्या किशीचा  वापर करण्यात आला आहे. सुमारे दीड ते चार फुटांच्या या आकर्षक मखरांची किंमत ५०० पासून ते १० हजार रुपयांपर्यंत आहे.

मोत्या, फुलांच्या माळा, शेला, फेटे-

१) फायबरचे मोदक हातात धरलेले, घंटी वाजवणारे उंदीर, सोंडेतून पाणी टाकणारे हत्ती, तारांमधून पाणी पडत असलेले धबधबे लक्षवेधी ठरत आहेत.

२) दागिन्यांमध्ये चमकदार मोत्यांच्या आणि फुलांच्या माळांसोबतच बाजूबंद कमरपट्टा, कंठी, मुकुट तसेच रंगीबेरंगी शेला, फेटे आणि धोतरदेखील खरेदीदारांचे आकर्षण ठरत आहे.

३) लालबागमध्ये या व्यवसायातील आमची तिसरी पिढी आहे. दरवर्षी सगळ्याच सजावटीच्या सामनामध्ये आणि मखरांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होत असतो. त्यामुळे ग्राहकांना दरवेळी नवीन प्रकारचे सामान उपलब्ध करून देण्यासाठी आमची दमछाक होते.- हेमंत नकाशे, व्यावसायिक 

४) गेली ३०-३५ वर्षांपासून येथे आमचे दुकान आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या मुखवट्यांची मागणी लोक करत असतात. या वर्षी गौरी गणपतीसाठी अमरावती पॅटर्नच्या मुखवट्यांना मागणी जास्त आहे. - स्वप्नील कसारे, गौरी मुखवटे विक्रेते, लालबाग

५) यंदा इको फ्रेंडली मखर बनवण्याचा आमचा प्रयत्न असला तरी ग्राहकांच्या मागणीचाही आम्हाला विचार करावा लागतो. सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या मखरांची मागणी वाढली आहे. दरवर्षी २०० ते २५० मखरांची विक्री होते. - गणेश देसाई, मखरविक्रेते, लालबाग

Web Title: in mumbai citizens flock to shop on holidays special demand for lakshmi asana and eco friendly makhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.