Join us  

पावसामुळे मुंबईकर ‘आजारी’; स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले, परिस्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 9:39 AM

गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई :  गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: स्वाइन फ्लू आणि गॅस्ट्रो या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. 

व्हायरल संसर्गाच्या विषाणूने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण तर दूषित पाणी पोटात गेल्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. अशी परिस्थिती असली तरी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.  

पावसाळा सुरू झाला की, वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांची संख्या वाढलेली असते. त्यामध्ये विशेष करून स्वाइन फ्लू सदृश लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पावसाचे पाणी साचल्याचा परिणाम-

१) ‘स्वाइन फ्लू’च्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी खोकला ही लक्षणे आढळून येत असल्याने या आजारांची चाचणी केली जात आहे तर काही वेळा लक्षणे बघून थेट स्वाइन फ्लूवरील औषधे सुरू केली जात आहेत. 

२) दरम्यान, दर पंधरा दिवसांनी महापालिकेचा आरोग्य विभाग या आजाराच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करत असते.

३) काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो आजाराचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. 

४) विशेष म्हणजे या आजारात नागरिकांना जुलाब आणि उलट्याच्या तक्रारी जाणवून येत आहे. त्याशिवाय काही नागरिकांच्या पोटात दुखत असल्याचे दिसून आले आहे.

‘नागरिकांनी पाणी उकळून प्यावे’-

१) धारावी येथील फॅमिली फिजिशियन डॉ. अनिल पाचनेकर यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 

२) नागरिक उघड्यावरचे अन्नपदार्थ खातात. त्यामुळे अन्नातून विषबाधा होत आहे. त्यामुळे नागरिक पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाने हैराण झाले आहेत. 

३) तसेच टायफॉइडचे काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, बाहेरचे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

निश्चितच स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या सर्वच रुग्णांच्या चाचण्या केल्या जात नाहीत. मात्र ज्यांना स्वाइन फ्लू सदृश लक्षणे आहेत. त्यांना  मात्र या आजारावरील उपचारपद्धती सुरू करण्यात येत आहे. तर काही जणांच्या मात्र चाचण्या करण्यात येत आहे. ७२ तासांत जर औषधे चालू केली तर चांगला परिणाम दिसून येत आहे.- डॉ. समीर गर्दे, श्वसनविकार तज्ज्ञ, परळ

दरवर्षी पावसाळ्यात रुग्णांची संख्या वाढत असते. महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखाने सज्ज आहेत. सध्याच्या स्थितीला परिस्थिती नियंत्रणात आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, (आरोग्य) मुंबई महापालिका

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊसस्वाईन फ्लूसंसर्गजन्य रोग