काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:43 AM2024-08-20T09:43:56+5:302024-08-20T09:46:09+5:30

कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारींवरून महापालिकेला घेरले असताना आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली आहे.

in mumbai citizens will get plenty of water engineers rush after commissioner ban dilapidated water channels will be replaced | काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारींवरून महापालिकेला घेरले असताना आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली आहे. ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जल अभियंता विभागाकडून तत्काळ पूर्व उपनगरातील मुलुंड तसेच भांडुप तसेच चेंबूर, मानखुर्दच्या विविध ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

आयुक्तांच्या सूचनेनुसार जल अभियंता विभागाने हालचाली सुरू केल्याने इतर भागांतील पाणी समस्याही लवकरच दूर होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  सातही जलाशयांत ९३ टक्के पाणीसाठा असताना मुंबईकरांना अनेक भागात मात्र कमी दाबाने आणि दूषित पाणी येत आहे. महापालिकेला या तक्रारींचा मागचे काही दिवस सामना करावा लागत आहे. घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये काही भागांत डोंगराळ वस्त्या मोठ्या प्रमाणावर आहेत. तेथे नागरी वस्तीत वर्षानुवर्षे लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील जलवाहिन्या बदलून लवकरच नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे.

९३% पाणीसाठा उपलब्ध, पाणी गळती होणार दूर-

१) पूर्व उपनगराप्रमाणेच पश्चिम उपनगरात ही अनेक ठिकाणी मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येत आहे.
 
२) यामुळे जल वाहिन्यांना गळती असल्यास ती दूर होईलच शिवाय दूषित पाण्याच्या पुरवठ्यावरही नियंत्रण येऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. 

‘फिल्डवर राहा’-

दूषित पाणी आणि कमी दाबाच्या तक्रारी दूर करण्यासाठी जल अभियंता विभागाच्या सर्व विभागाचे दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आदींसह सर्व यंत्रणांनी फिल्डवर राहणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

त्यामुळे आता जल अभियंता विभागाकडून कशा पद्धतीने कार्यवाही केली जाणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

ओव्हर टाइमची वेळ-

१) चावीवाला आणि सुलूसमन हे दोन घटक या प्रक्रियेतील महत्त्वाचे आहेत. चावीवाला सुलूसमन यांच्या कामावर देखरेख ठेवतो. 

२) मात्र, सुलूसमनची संख्या कमी असल्याने अनेकदा चावीवाल्याला त्यांची कामे करावी लागतात. त्यासाठी अनेकदा ओव्हर टाइमही करावा लागतो. 

३) अनेक सुलूसमन निवृत्त झाले आहेत. त्यांची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे चावीवाल्यांवरील कामाचा भर वाढला आहे, असे म्युनिसिपल कर्मचारी कामगार युनियनचे संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले. 

काय आहेत प्रश्न?

१) घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये काहीशा डोंगराळ भागात उंचावर वस्त्यामध्ये पाण्याचे प्रश्न कायम आहेत.

२) पाण्याचा पुरेसा दाब नसल्याने पाण्यासाठी खाली यावे लागते.

Web Title: in mumbai citizens will get plenty of water engineers rush after commissioner ban dilapidated water channels will be replaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.