मुंबई शहरात एक हजार पुरुषांमागे 779 महिलाच साक्षर, उपनगरात 794
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:46 PM2023-11-08T13:46:17+5:302023-11-08T13:46:25+5:30
लोकसंख्येचा विचार करता अजूनही मोठा पल्ला गाठण्याची कसोटी
मुंबई : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईतील महिलांचा साक्षरतेचा टक्का अधिक दिसत असला तरी अजूनही मुंबई शहरात एक हजार पुरुषांमागे ७७९, तर उपनगरात ७९४ महिलाच साक्षर आहेत. लोकसंख्येचा विचार करता मुंबईला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे.
मुंबईत अद्याप १४ टक्क्यांच्या आसपास महिला निरक्षर असल्याचे जनगणनेचा २०११चा अहवाल सांगतो. केंद्र सरकारच्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील १५ ते ३५ वर्षे वयोगटातील १२ लाख निरक्षरांना शोधून साक्षर करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मात्र, अनेक कारणांमुळे शिक्षकांनी या मोहिमेला विरोध केला असून, असहकाराची भूमिका घेतली आहे. त्यामुळे
मुंबईत केवळ ९७० निरक्षरांना (पुरुषांचाही समावेश) शोधण्यात यश आले आहे.
मुंबईत या मोहिमेत काम केलेले ‘खार एज्युकेशन सोसायटी’चे शिक्षक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये महिला निरक्षर मोठ्या संख्येने आहेत. साधारण प्रत्येक पाच जणांमध्ये तीन तरी महिला निरक्षर आढळून येतात.
उपनगरात साक्षरता अधिक
मुंबईचे शहर आणि उपनगरापैकी उपनगरातील साक्षरतेचा टक्का अधिक आहे.
मुंबईची एकूण साक्षरता ८९.२
मुंबई शहरातील साक्षरता ८८.४८
मुंबई उपनगरातील साक्षरता ९०.९०
मुंबई शहरातील पुरुषांची साक्षरता ९०.५४
मुंबई उपनगरातील पुरुषांची साक्षरता ९४.२८
मुंबई शहरातील महिलांची साक्षरता ८६.०३
मुंबई उपनगरातील महिलांची साक्षरता ८६.९३
शिक्षक भरती २०१२ नंतर झालेली नाही. प्रत्येक शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. रिक्त पदांच्या कामाचा भार शाळेतील शिक्षकांवर येतो. त्यात या कामाची भर पडली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार सार्वत्रिक निवडणुका आणि जनगणनेच्या कामाव्यतिरिक्त शिक्षकांवर कुठलेही काम सोपवता येत नाही.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ.
शिक्षकांनी कार्यक्रमावर अशैक्षणिक ठरवून बहिष्कार घातला आहे. सप्टेंबरपर्यंत निरक्षरांची नोंदणी पूर्ण व्हायला हवी होती, परंतु बहिष्कारामुळे काम थांबलेले आहे.
-महेश पालकर,
संचालक, योजना