रेश्मा शिवडेकर, मुंबई : जागेची चणचण, पालक-शिक्षकांचा विरोध अशा अनेक अडचणींचा सामना मुंबईतीलशाळांना चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरविताना करावा लागणार आहे. संपूर्ण शाळाच दोन शिफ्टमध्ये भरविणाऱ्या शाळांचा तर चौथीपर्यंतचे सर्व वर्ग एकाच वेळेस भरविण्याला जोरदार विरोध आहे.
काही शाळांमधील प्राथमिकच्या शिक्षकांना उशिराची वेळ मान्य नाही; तर काही शाळांकडे प्राथमिकचे वर्ग एकाच वेळी भरविता येतील इतक्या पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे शाळा पालकांकडून गुगल फॉर्म किंवा शिक्षक-पालक सभेत त्यांची मते जाणून घेत आहेत. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिकच्या मुलांना प्ले वे मेथडने शिकवावे लागते. त्यामुळे त्यांच्या वर्गांची रचना, बैठक व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण असते.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलांच्या सुरक्षेचा. दुपारच्या सत्रात वर्ग भरविले तर मुलांना पाच-साडेपाचला सोडावे लागेल. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लवकर अंधार पडत असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार आहे. त्या वेळेस पवई परिसरात वाहतुकीची कोंडी वाढते. याकडे पवईच्या ए. एम. नाईक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. मधुरा फडके यांनी लक्ष वेधले. म्हणून आम्ही आता पालकांकडूनच गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांचे मत जाणून घेत आहोत, अशी पुस्ती त्यांनी जोडली. दुपारच्या सत्राला आमच्या शाळेतील शिक्षकांचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही शिक्षक-पालक सभेत बदललेल्या वेळांबाबत चर्चा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया सांताक्रूझमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.
१) काही शाळांना वेळा बदलण्यात काहीच अडचण नाही. कुर्ला येथील गांधी बालमंदिर हायस्कूलमध्ये प्राथमिकचे वर्ग सकाळी भरतात आणि उर्वरित दुपारच्या वेळेस. नवीन वर्षापासून प्राथमिक आणि मोठ्या वर्गाच्या वेळांची अदलाबदल करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी एप्रिलमध्ये नियोजन करून बदलणाऱ्या वेळांबाबत पालकांना विश्वासात घ्यावे लागेल.- जयवंत कुलकर्णी, शिक्षक
२) आमचे पहिली ते सातवीचे वर्ग पहिल्यापासूनच दुपारच्या सत्रात भरविले जाते आहेत. पूर्व प्राथमिकच काही वर्ग साडेआठला भरत होते. ते आणखी अर्धा तास उशिरा भरवावे लागतील.- शुभदा निगुडकर, बालमोहन विद्यामंदिर, दादर
शाळेची रचनाच प्रतिकूल - मुंबईतील अनेक शाळांमध्ये प्राथमिकसह दहावीपर्यंतचे वर्ग दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये भरविले जातात. त्यामुळे या शाळांची रचनाच तशी आहे. पवईतील बहुतेक शाळा सकाळी पावणेसात ते बारा आणि एक ते पाच अशा दोन शिफ्टमध्ये भरतात. प्राथमिकचे वर्ग दोन वेगवेगळ्या वेळांत विभागले जातात. पूर्वप्राथमिक आणि पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी एकाच वेळी बसू शकतील इतके वर्गच या शाळांकडे पुरेशा संख्येने नाहीत.