Join us  

रेल्वे रुळांवर पाणी साचू नये, म्हणून आता वर्षभर सफाईची कामे; पालिकेने घेतला धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 9:56 AM

मागील आठवड्यात बुधवारी, २५ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दाणादाण उडाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मागील आठवड्यात बुधवारी, २५ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दाणादाण उडाली होती. रेल्वे बंद पडून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्याची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. पाणी साचून रेल्वे बंद पडू नये यासाठी रेल्वे मार्गाच्या साफसफाईची कामे केवळ पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर न करता वर्षभर करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात रेल्वे प्रशासन, महापालिका पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पूल विभाग, रस्ते विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत लोहमार्गांवर पाणी साचण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना आखणे या विषयावर चर्चा झाली. लोहमार्गाची स्वच्छता करणे ही कामे कमीत कमी कालावधीत पूर्ण केली जावीत, असे  स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. 

कुठे साचते पाणी? 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भांडुप, विद्याविहार, सायन - माटुंगा दरम्यानचा रेल्वे मार्ग, विक्रोळी - कांजूरमार्ग दरम्यानचा रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वेचा शिवडी - वडाळा मार्ग, कुर्ला, कुर्ला - मानखुर्द मार्ग, गुरू तेगबहादूर नगर - चुनाभट्टी, कुर्ला - टिळक नगर आदी ठिकाणी लोहमार्गावरील पाणी साचण्याची ठिकाणे आणि त्यावर उपाययोजनांची चर्चा झाली.    

विभाग ठेवणार समन्वय?

रेल्वेच्या हद्दीत पालिका स्वखर्चाने नाले स्वच्छतेची कामे करते. काही कामे रेल्वेमार्फत केली जातात. पालिका आणि रेल्वेने एकत्रित कामे केली पाहिजेत. स्वच्छता मोहीम संयुक्तपणे पूर्ण करावी. जलवाहिन्या विभाग, पूल विभाग, रस्ते विभाग आणि प्रशासकीय विभाग यांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. 

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे...

१) काही ठिकाणी रेल्वेच्या रुळाखालील भाग अरुंद असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्याची  विनंती रेल्वे विभागाने केली आहे. त्यापैकी काही कामे रेल्वे पालिकेने दिलेल्या निधीतून करणार असून, काही कामे पालिकेने करावीत. 

२) निवासी भागातील पावसाळी जलवाहिन्यांच्या जाळ्यांच्या  विस्तारीकरणाचा मुद्दा रेल्वे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिला. महानगरपालिकेने कामांची यादी विनाविलंब तयार करून त्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करावी. 

३) पुढील पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. रेल्वे रुळाखालील बंदिस्त मार्गांचे विस्तारीकरण करताना मायक्रो टनेलिंग करण्याबाबत निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले.

टॅग्स :मुंबईपाऊसरेल्वे