'मेट्रो ३'च्या तपासणीसाठी ‘सीएमआरएस’ला पाचारण; प्रमाणपत्र मिळताच पहिला टप्पा होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:11 AM2024-09-16T10:11:47+5:302024-09-16T10:15:01+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून, त्यात पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या डब्यांची तपासणी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) पथकाकडून केली जाणार आहे. त्याचा तपासणी कार्यक्रम मुंबई मेट्रो रेल्वेला प्राप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या ट्रॅकची तपासणीही या पथकाकडून केली जाणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यावर एकूण २७ स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते आरे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके असतील. एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी करून घेतली असून, आता कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) मार्फत तपासणी होईल.
सीएमआरएसकडून प्रमाणपत्र प्राप्त होताच पहिला टप्पा सुरू होईल. सीएमआरएस पथकाकडून हे पथक नक्की कधी दाखल होणार आहे, याबाबत एमएमआरसीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
विद्युत प्रवाह सुरू होणार-
१) एमएमआरसीद्वारे मेट्रो डेपोतील ४.५ किमी लांबीच्या एफओसीएस स्टेबलिंग झोनमधील मार्गाचा विद्युत प्रवाह सुरू केला जाणार आहे.
२) त्यात १७ सप्टेंबरला १.१३ किमी लांबीच्या मार्गावर, तर २८ सप्टेंबरला ३.४२ किमी लांबीच्या मार्गावर विद्युत प्रवाह सुरू होईल.
आरे ते बीकेसी मार्ग-
डब्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या मार्गाच्या ट्रॅकची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी पूर्ण होऊन त्याचे प्रमाणपत्र प्राप्त होताच हा मेट्रो मार्गदेखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. आचारसंहितेपूर्वी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरसीने केले आहे.