एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:57 AM2024-07-16T09:57:25+5:302024-07-16T10:01:47+5:30
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली.
मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. शुक्रवार, १२ जुलैपासून कोस्टल रोडवर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बेस्ट बसने पहिल्याच दिवशी ७९३ प्रवाशांनी गारेगार प्रवास करत कोस्टल रोडची सफर केल्याने बेस्टच्या तिजोरीत पहिल्या दिवशी ४,४४२ रुपयांचा महसूल जमा झाला.
बेस्टची नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए-७८ ही बस एन. सी. पी. ए. (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) मरिन ड्राइव्ह, ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग’ दरम्यान प्रवासी सेवेत धावत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवासी सेवेत ही एसी बस उपलब्ध करण्यात आली आहे.
कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा ११ मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्ह दरम्यान १२ मार्चपासून वाहतुकीसाठी खुला केली. १० जून रोजी मरिन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन १० जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
हे आहेत बसचे मार्ग-
१) ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग’ (कोस्टल रोड), पारसी जनरल रुग्णालय जंक्शन- वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली)
२) महालक्ष्मी रेसकोर्स - महालक्ष्मी रेल्वे स्थानक - सातरस्ता भायखळा स्थानक (प). असा असेल. एन. सी. पी. ए. (नरिमन पॉइंट) येथून बस सकाळी ८:५० वाजता सुटत असून, शेवटची बस रात्री ९ वाजता सुटत आहे.