लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्या (कोस्टल रोड)च्या दक्षिणेकडील वाहतूक यापुढे आठवड्यातील सातही दिवस केवळ सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, तर उर्वरित वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान कोस्टल रोड ६ ते १८ सप्टेंबरपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता.
कोस्टल रोडचा (दक्षिण वाहिनी) प्रकल्प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. दक्षिण वाहिनी बिंदुमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरिन ड्राइव्ह ही मार्गिका, तसेच उत्तर वाहिनी मरिन ड्राइव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे.
दरम्यान, कोस्टल रोडचे (दक्षिण) उर्वरित काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना पालिकेने केली आहे.
प्रकल्पाचे काम ९२ % पूर्ण-
१) एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
२) या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत.
३) दक्षिण-उत्तर मुंबईकडून ये-जा करणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे आहेत. या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे.
वाहतुकीसंदर्भात सूचना-
कोस्टल रोडवर वाहने थांबविण्यास, प्रवाशांना उतरण्यास व छायाचित्र काढण्यास, चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे. तसे करताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे.