मुंबई :मुंबईविद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहाच्या मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात पुन्हा एकदा झुरळ सापडले आहे. शनिवारी दुपारच्या जेवणावेळी हा प्रकार घडला. याबाबत एका विद्यार्थ्याने याची तक्रार वसतिगृहाच्या वॉर्डनकडे केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या वसतिगृहाच्या मेसमध्ये झुरळ सापडल्याची घटना गेल्या आठवड्यात बुधवारी घडली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारच्या जेवणावेळी पुन्हा हा प्रकार घडला. एका विद्यार्थ्याच्या भातामध्ये मेलेले झुरळ आढळून आले. विद्यार्थ्याने या प्रकाराची तक्रार तात्काळ वसतिगृहाच्या वॉर्डनकडे केली आहे. यातून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती या तक्रारीत विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. तसेच हे प्रकार पुन्हा घडू नये, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता पालिकेच्या अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे पत्र देऊन त्यांना गुणवत्ता तपासण्यास सांगितल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मेसचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडे?
या प्रकारांबाबत विद्यार्थ्यांशीही बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी समिती गठीत करून स्वत: मेसचे व्यवस्थापन पाहण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली.
खुलासा मागितला-
१) विद्यापीठातील मेसला अचानक भेट देऊन तपासणी करावी. तसेच ही तपासणी दर पंधरा दिवसातून केली जावी, असे पत्र पालिकेच्या अन्न व औषध प्रशासन दिले आहे.
२) अन्न पुरवठादाराला शनिवारी नोटीस बजावून या घटनांबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे.