लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ 'मेट्रो ३' मार्गिका उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडली जाणार आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकातून उतरल्यावर प्रवाशांना थेट विमानतळ, उपनगरी रेल्वे स्थानकांत जाऊन पुढील प्रवास सहजरीत्या करता येणार असून, मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) कुलाबा ते सीप्झ 'मेट्रो ३' ही ३३.५ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण २७ स्थानके असतील. या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा मार्ग सुरू होत असून, त्यावर एकूण १० स्थानके असतील. या मार्गाचे लोकार्पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. यामुळे आरे ते कफ परेडदरम्यानचा प्रवास एका तासात होणार आहे, तसेच अन्य मार्गिकांवरून आलेल्यांनाही नऊ ठिकाणी जोडणी देण्यात आली आहे.
कोणते स्थानक कुठे जोडणार, हे सर्वांना माहिती असलेच पाहिजे...
पहिला टप्पा-
१) बीकेसी 'मेट्रो २ बी'च्या आयटीओ स्थानकाला जोडले जाणार. त्यासाठी स्काय वॉक, ट्रॅव्हलेटरची होणार उभारणी.
२) आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ विमानतळाच्या टर्मिनल १ ला रस्त्यावरील पादचारी मार्गान, तर सबवेद्वारे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणी देणार.
३) विमानतळ टर्मिनल २ आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २, तसेच मेट्रो ७ अ मार्गिकेला कॉनकॉर्स लेव्हलला जोडणार.
४) मरोळ नाका मेट्रो १ मार्गिकेच्या मरोळ मेट्रो स्थानकाला जोडणार.
५) आरे जेव्हीएलआर मेट्रो ६ मार्गिकेच्या सीप्झ व्हिलेज स्थानकाला जोडणार.
दुसरा टप्पा-
१) चर्चगेट- चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाला जोडणी दिली जाणार. पादचारी मार्गाने, तसेच सबवेद्वारे ही दोन्ही स्थानके जोडली जाणार.
२) सीएसएमटी मेट्रो स्थानक- सीएसएमटी रेल्वे टर्मिनलला सबवेद्वारे जोडणी दिली जाणार.
३) जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो स्थानक- पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानक आणि एसटी महामं- डळाचे मुंबई सेंट्रल स्थानकांना जोडले जाणार.
४) महालक्ष्मी - पश्चिम रेल्वेचे महालक्ष्मी स्थानकाला जोडणी देणार आहेत, तसेच मोनोरेल स्थानकाला फूट ओव्हर ब्रीजद्वारे जोडणी दिली जाणार आहे.