मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली पूर्व येथील आकुर्ली सब वेचे रुंदीकरण सुलभ करण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा काढल्या होत्या. या सब वेचे काम अद्यापही सुरूच आहे. यामुळे पिक अवर्समध्ये वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असून, मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. पिक अवर्समध्ये कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळेचा अपव्यय होत आहे.
आकुर्ली सब-वेच्या कामासाठी आकुर्लीतील उत्तरेकडील काही भाग बंद केला आहे. यामुळे अंधेरीपासून ते थेट कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सपर्यत हायवेवरील १० किमीच्या प्रवासाला पीक अवर्समध्ये तब्बल ८० मिनिटे लागत आहेत.
सब-वेच्या कामामुळे लोखंडवाला टाऊनशिप, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि कांदिवली रेल्वे स्थानकाला जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या आकुर्ली रोडवरील वाहतुकीवर परिणाम होत आहे. हे काम कधी पूर्ण होईल, याबाबत स्पष्टता नाही. भुयारी मार्ग सध्या झाकलेला असून येथे कोणतेही काम होताना दिसत नाही. संपूर्ण परिसरात हा एकमेव प्रवेश रस्ता आहे. येथील पर्यायी डीपी रस्ताही अडवला जात असल्याने रहिवाशांमध्ये संताप आहे.- हेपझी अँथनी, रहिवासी म्हाडा, लोखंडवाला, कांदिवली पूर्व
३.५ किमीसाठी तासभर-
गोरेगावच्या ओबेरॉय मॉलपासून आकुर्ली सब-वेच्या कामापर्यंत सुमारे ३.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ लागत आहे.
या सब-वेचे काम कोविडआधी सुरू झाले होते. कोविडमध्ये काम एक वर्ष बंद होते. पश्चिम द्रुतगती महामार्ग हा बंद करता येत नसल्याने कामात संथगती आहे. या मार्गावर कांदिवलीपासून ते दहीसरपर्यंत महानगर गॅसची वाहिनी जात होती. त्यामुळे ती वाहिनी पाठपुरावा करून शिफ्ट करून घेतली. या कामामध्ये आठ महिने गेले. हे सर्व अडथळे पार करत येत्या सप्टेंबरमध्ये या प्रलंबित सब वेचे काम पूर्ण होईल. - अतुल भातखळकर आमदार, कांदिवली पूर्व विधानसभा