Join us  

रेशनवर प्लास्टिकचे तांदूळ मिळाल्याची तक्रार; पुरवठा अधिकाऱ्यांनी मात्र दावे फेटाळले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:09 AM

दिंडोशीत रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : दिंडोशीत रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. मात्र, हा फोर्टिफाईड पौष्टिक तांदूळ असून, राज्यातील सर्व रेशन दुकानांवर याचे वितरण सुरू असल्याची माहिती शिधावाटप अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

दिंडोशीतील नागरी निवारा परिषद येथे राहणाऱ्या संपत खामकर यांनी परिसरातील रेशन दुकानातून तांदूळ घेतले. मात्र, हे प्लास्टिकचे तांदूळ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घरी तांदूळ निवडले असता, प्लास्टिकचे तांदूळ आढळले. आपण ते वेगळे केले, असे त्यांनी सांगितले. 

रेशन दुकानावर प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याचे परिसरातील काही नागरिकांचेही म्हणणे आहे.  दुकानाचे मालक पवन गुप्ता यांना नागरिकांनी जाब विचारल्यावर त्यांनी प्लाटिकचे तांदूळ  नसल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांच्या तक्रारी आल्यावर पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी हे जास्त पौष्टिक असलेले फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे त्यांना सांगितले.  

अन्न व नागरी पुरवठा विभागाने या तांदुळाची शहानिशा करावी. संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यांनी योग्य यंत्रणेकडून त्याची तपासणी करावी. नागरिकांना प्लास्टिकचा तांदूळ वितरित होत असेल तर उद्धवसेनेच्या वतीने मुंबईत सर्व शिधावाटप कार्यालयांबाहेर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. सुनील प्रभू यांनी दिला आहे.

नागरिकांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. हा फोर्टिफाईड पौष्टिक तांदूळ असून, राज्यातील सर्व रेशन दुकानांवर त्याचे वितरण सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांना माणशी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मोफत देण्यात येतो. हा तांदूळ आरोग्यास अपायकारक नसून यात पौष्टिक जीवनसत्त्व आहेत. हा तांदूळ चिकट होतो व हाताला चिकटतो. - गणेश खिरपानी, साहाय्यक शिधावाटप अधिकारी, गोरेगाव 

टॅग्स :मुंबईराज्य सरकार