महापालिकेकडे विविध नागरी समस्यांच्या तक्रारींचा पाऊस; प्रजा फाउंडेशनच्या अहवालात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:26 AM2024-05-30T10:26:29+5:302024-05-30T10:28:22+5:30
तक्रारींत ५० टक्के वाढ.
मुंबई : मुंबईतील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांनी महापालिकेकडे केलेल्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१४ ते २०२३ या कालावधीत या तक्रारींमध्ये तब्बल ५० टक्के वाढ झाली असल्याचे प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उघड झाले आहे. प्रजा फाउंडेशनने केलेल्या पाहणीत सार्वजनिक शौचालयांबरोबरच हवेची गुणवता, नदी-समुद्रातील प्रदूषण, नागरिकांच्या तक्रारींची दखल आदी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मलनिःसारण वाहिन्या, उद्याने, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, पर्जन्य जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी समस्यांसंदर्भातील तक्रारींमध्ये २०१४ ते २०२३ या कालावधीत ५० टक्के वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे रस्त्यांच्या तक्रारींचे प्रमाण घटल्याचे अहवालात म्हटले आहे. पालिकेच्या ‘सिटीझन चार्टर ऑफ मुंबई’नुसार नागरी समस्यांच्या तक्रारींचा निपटारा सहा दिवसांत झाला पाहिजे; पण सध्या त्यासाठी ३२ दिवस लागत आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हवेचा दर्जा घसरला, प्रदूषणही वाढले-
१) २०१९ ते २०२३ या कालावधीत वायुप्रदूषणाच्या तक्रारी ३०५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
२) २०१९ ते २०२३ दरम्यान हवेचा दर्जा २२ टक्क्यांनी घसरला आहे.
३) २०१९ ते २०२३ या कालावधीत प्रदूषणाच्या तक्रारीत १८३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
जैवविविधता धोक्यात-
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे आठ प्रकल्प मुंबईत आहेत. तरी नदी-समुद्र आणि खाड्यांमधील प्रदूषण किमान दोन ते कमल पाच पटींनी वाढले आहे. त्यामुळे पाण्यातील जैवविविधता धोक्यात आली आहे.
घनकचरा, जलवाहिन्या, उद्यानांची दुरवस्था-
१) २०१४ मध्ये रस्त्यांच्या तक्रारींचे प्रमाण २१ हजार ७७७ होते. २०२३ मध्ये त्यात घट होऊन ते १० हजार ५४९ वर आले आहे.
२) प्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण १३५ वरून ७६० वर गेले आहे.
३) प्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण ४६३ टक्क्यांनी वाढले आहे.
४) घनकचरा व्यवस्थापनाबाबत तक्रारी सात हजार ३३१ वरून थेट २४ हजार ६९० वर गेल्या आहेत.
५) शौचालयांच्या तक्रारी २५७ होत्या. त्यात वाढ होऊन त्या ५४४ झाल्या आहेत.
६) पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सात हजार ६४५ होत्या. त्यात घट झाली असून, त्या १४ हजार ७५२ इतक्या नोंदवल्या गेल्या आहेत.
७) सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याबाबतच्या तक्रारी ४२५ वरून एक हजार ६५२ वर पोहोचल्या आहेत.
८) पालिकेच्या कारभाराच्या तक्रारी ५०४ वरून ७५९ आहेत.
९) उद्यानांच्या दुरवस्थेतबाबतच्या तक्रारी एक हजार ५९५ होत्या, त्यात वाढ होऊन त्या तीन हजार ६४४ झाल्या आहेत.
१०) पर्जन्य जलवाहिन्या तक्रारींमध्येही वाढ झाली असून, त्या एक हजार १६० वरून दोन हजार ७१३ वर नोंदवल्या गेल्या आहेत.
११) एकूण सर्व तक्रारींचे प्रमाण ८० हजार ४२० वरून एक लाख २० हजार २९६ इतके वाढले आहे.