Join us

आपत्कालीन कक्षात तक्रारींचा 'पाऊस'; खणखणत होते फोन; कर्मचारी,अधिकाऱ्यांना उसंत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 10:21 AM

रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात असे चित्र होते.

मुंबई : सतत खणखणणारे फोन, अमूक एका भागात पाणी साचलेय, अमक्या भागात लोकांच्या घरात पाणी शिरलेय, याठिकाणी झाड पडलेय, त्याठिकाणी वाहतूक कोंडी झालीय... तक्रारी प्राप्त होताच संबंधित विभाग कार्यालयाला दिल्या जाणाऱ्या सूचना, एकाचवेळी अनेक यंत्रणांसोबत ठेवला जाणारा संपर्क, मुंबईतील ७० हजार सीसीटीव्हींवर नजर ठेवून घेतला जाणारा आढावा... रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात असे चित्र होते.

कक्षातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जराही फुरसत नव्हती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची क्षणाक्षणाला माहिती घेतली जात होती. त्यासाठी या यंत्रणांसोबत सातत्याने संपर्क साधला जात होता. मुंबईत ठिकठिकाणी लावण्यातआलेल्या सीसीटीव्हींवर काय सुरू आहे, याची माहिती या कक्षातील मोठ्या भिंतीवर दिसते.

या भिंतीवर सगळ्या सीसीटीव्हींचे लाइव्ह चित्र दिसते. त्यामुळे कोणत्या भागात नेमके काय चित्र आहे, ते स्पष्ट होत होते. १९१६ या क्रमांकावर तक्रार आल्यावर तक्रारीची सत्यता पडताळून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभाग कार्यालयाला सतर्क केले जात होते

अलर्ट मोडवर-

संध्याकाळी सहाच्या सुमारास हवामान विभागाकडून रेड अलर्ट' आल्याने कक्ष अधिक सतर्क झाला. त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोणत्या आपत्तीसाठी कोणती यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे, त्यानुसार सूचना दिल्या जात होत्या. कोणत्या ठिकाणी पाणी तुंबले आहे, याची माहिती २४ विभाग कार्यालयांना दिली जात होती. मदतकार्याचे थेट नियंत्रण कक्षातून केले जात होते. सर्वाधिक तक्रारी या पाणी तुंबल्याच्या आणि घरात पाणी शिरल्याच्या होत्या.

टॅग्स :मुंबईपाऊस