पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी टळणार; अमर महल जंक्शन येथे विशेष स्पॅन उभारण्याचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:06 PM2024-09-03T12:06:47+5:302024-09-03T12:08:10+5:30

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेवर अमर महल जंक्शनजवळ आता १०७ मीटर लांबीचा विशेष स्टील स्पॅन बसविण्यात येणार आहे.

in mumbai congestion on eastern expressway will be avoided decision to build a special span at amar mahal junction  | पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी टळणार; अमर महल जंक्शन येथे विशेष स्पॅन उभारण्याचा निर्णय 

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी टळणार; अमर महल जंक्शन येथे विशेष स्पॅन उभारण्याचा निर्णय 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेवर अमर महल जंक्शनजवळ आता १०७ मीटर लांबीचा विशेष स्टील स्पॅन बसविण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. त्यातून पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी संभाव्य कोंडी टळणार आहे. 

मेट्रो ४ ही मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची असून त्यावर ३० स्थानके असणार आहेत. एमएमआरडीएच्या २०१८ मधील नियोजनानुसार या मार्गिकेच्या कामासाठी सुमारे १४,५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या मेट्रोचे काम एकूण ५ पॅकेजमध्ये सुरू आहे. यातील पॅकेज ८ मध्ये अमर महल जंक्शन येते. या भागातून पूर्व द्रुतगती मार्ग आणि घाटकोपर मुलुंड रस्ता जातो. त्यातून या भागात कायमच वाहनांची वर्दळ असते. 

मेट्रो ४ मार्गिकाही याच भागातून जाणार आहे. यापूर्वी अमरमहल जंक्शन क्रॉस करण्यासाठी या मेट्रो मार्गिकेवर या भागात तीन स्पॅनवर उभारणी प्रस्तावित होती.
 त्यामध्ये एक स्पॅन ३८.६ मीटर लांबीचा, दुसरा स्पॅन ४८.४ मीटरचा आणि तिसरा स्पॅन ४४ मीटरचा उभारण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. या तिन्ही स्पॅनची एकत्रित लांबी १३१ मीटर प्रस्तावित होती. 

यावेळी वाहतूक पोलीस सहआयुक्त यांनी अमर महल जंक्शनलाही भेट दिली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतुकीचा आढावा घेतल्यानंतर यामध्ये बदल सांगितले होते. त्यानुसार आता एमएमआरडीएकडून या भागात १०७ मीटर लांबीच्या विशेष संमिश्र स्टील प्रकारातील स्पॅनची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मेट्रो खांबाचा वाहतुकीला अडथळा-

अमर महल जंक्शन येथे मेट्रो मार्गिका १५० मीटर त्रिज्येचे तीव्र वळण घेणार आहे. यापूर्वी या भागात तीन खांब उभारून त्यावर मेट्रो मार्ग उभारला जाणार होता. त्यानुसार या मेट्रोचा एक पिअर अमर महल जंक्शन व सांताक्रूझ चेंबूर लिंक रस्त्याच्या मधोमध येणार होता. या पिअरमुळे या भागातील वाहतुकीला कायमचा अडथळा निर्माण होणार होता.

वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर बदल -

१) अमर महल जंक्शन येथे काम करण्यासाठी कंत्राटदाराने वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. 

२) यावेळी वाहतूक पोलीस सहआयुक्त यांनी अमर महल जंक्शनलाही भेट दिली होती. 

३) त्यांनी अमर महल जंक्शन व सांताक्रूझ चेंबूर लिंक रस्त्याच्या मधोमध पिअर उभारणीला परवानगी नाकारली होती.

४) त्यानंतर कंत्राटदाराने सुधारित प्रस्ताव सादर करत हा पिअर वगळून त्याजागी सलग अशा १०७ मीटर लांबीच्या स्पॅनचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे.

Web Title: in mumbai congestion on eastern expressway will be avoided decision to build a special span at amar mahal junction 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.