Join us  

अंधेरीतील गोखले पुलाची जोडणी २३ ऑगस्टपर्यंत; गर्डरचे सुटे भाग दाखल, जोडणीचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:19 AM

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता २३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरची जोडणी पूर्ण होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता २३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरची जोडणी पूर्ण होणार आहे. 

पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सर्व भाग मुंबईत दाखल झाले असून जोडणीचे काम पालिकेने सुरू केले आहे. त्यानंतर रेल्वेशी समन्वय साधून गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉक घेतला जाईल आणि मग इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुढच्या पावसाळ्याआधी गोखले पुलावरील रहदारी पूर्णपणे सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याने मार्च २०२५ ते मे २०२५ च्या दरम्यान पुलाचे काम पूर्ण होईल असे पालिकेचे अतिरिक्त  आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. 

गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरच्या जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे रूळ मार्गावर गर्डर पुढे नेणे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे अशी अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानाची कामे पार पाडावी लागणार आहेत. गर्डरचे वजन, त्याला स्थापन करण्याचे अंतर इत्यादी बाबी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनासोबत अचूक समन्वय साधने आणि वेळापत्रकाप्रमाणे कामे पार पाडणे आवश्यक असणार आहे. 

१४ नोव्हेंबरपर्यंत सर्फेसिंग पूर्ण करणार-

१) गर्डर लॉन्चिंग झाल्यानंतर पालिकेकडून लागलीच सर्फेसिंग व काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात येतील. 

२) कंत्राटदाराला ती १४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत पालिकेकडून देण्यात आली आहे. 

३) संबंधित कंत्राटदाराला गर्डरचे सुटे भाग मुंबईत आणण्यास उशीर झाल्याने या आधीच पालिकेकडून दंड करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील मुदतीत त्याने काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.

मार्चनंतरच मार्गिका पूर्ण-

रेल्वे प्राधिकरणाच्या ब्लॉक आणि गर्डर लाँचिंगसाठी अंदाजे ६० दिवसांचा कालावधी लागू शकण्याची शक्यता आहे. गर्डर लाँचिंगनंतर लागलीच पोहोच रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले. या पोहोच रस्त्यांच्या कामासही ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने गोखलेची मार्गिका मार्चनंतरच पूर्ण होणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअंधेरी