Join us  

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:50 AM

नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टील डेकच्या उभारणीचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यानुसार केबल स्टेड पुलाच्या उभारणीच्या अंतिम टप्प्यातील कामांची पूर्वतयारी एमएमआरडीएने केली आहे. नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. 

एससीएलआर रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला जात आहे. आता अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या केबल स्टेड ब्रीजचे काम सुरू आहे. हा पूल आर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील असून पश्चिम द्रुतगती मार्गावर त्याचे वळण अतिशय तीव्र असणार आहे. त्यामुळे हा पूल देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे. 

पुलावर गर्डर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर आता स्टीलचा डेक उभारला जाणार आहे. या पुलाच्या लॉन्चिंगसाठी एमएमआरडीएला वाहतुकीचा ब्लॉक हवा आहे. त्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. 

आर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील पूल-

ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील केबल स्टेड पूल असणार आहे. त्यातून अभियांत्रिकी स्वरूपात हे काम काहीसे किचकट आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. डेकच्या लॉन्चिंगनंतर पुलावर केबल उभारणीचे काम सुरू होणार आहे. त्यातून उर्वरित सर्व कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन केले आहे. 

चार वेळा मुदतवाढ-

१) एमएमआरडीएकडून एससीएलआर प्रकल्पाचे काम २०१६ मध्ये हाती घेतले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार २०१९ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. 

२) मात्र, विविध कारणांनी या प्रकल्पाचे काम रखडले असून, त्याला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

३) त्यातून एमएमआरडीएने कंत्राटदाराला आतापर्यंत २.५ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. आता डिसेंबरमध्ये तरी हा मार्ग खुला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :मुंबईएमएमआरडीएरस्ते वाहतूकचेंबूर