लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एका ज्येष्ठ नागरिकाची मोबाइल सेवा अचानक खंडित केल्याबद्दल तसेच त्याला आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक वापरून न देता त्याची एक प्रकारे मानसिक छळवणूक करण्यात आली, असे निरीक्षण नोंदवित ग्राहक मंचाने व्होडाफोन-आयडिया कंपनीला संबंधित ज्येष्ठ नागरिकाला ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
ज्येष्ठ नागरिकाची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक छळ अणि यातना यांना कारणीभूत ठरल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (मध्य मुंबई) यांनी ‘व्होडाफोन-आयडिया’ला दोषी ठरविले.
मुंबईतील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने २ मे २०१९ पासून २८ दिवसांसाठी त्यांच्या मोबाइल नंबरवर आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा घेतली होती. त्यात अनलिमिटेड इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स, तसेच ५.२ जीबी डेटाचा समावेश होता.
७२ हजार आकारले-
केनियाला पोहोचल्यानंतर तक्रारदाराने प्लॅनचा वापर करणे सुरू केले. त्यांनी ७५ टक्के डेटा वापरला. झिम्बाब्वे येथील व्हिक्टोरिया येथे तक्रारदाराने भेट दिली.
हा देशही पॅकमध्ये समाविष्ट असेल, असे तक्रारदाराला वाटले. मात्र, तेथे त्याचा उपयोग झाला नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, नवीन देशात प्रवेश केल्यानंतर कंपनीकडून रोमिंग दराबाबतचा मेसेज आला नाही.
अनावधानाने १२४ एमबी डेटा वापरल्यावर कंपनीने मोबाइल सेवा खंडित केली. तसेच त्यासाठी ७२ हजार ४१९ रुपये आकारले.
कंपनीने विनंती फेटाळली-
१) तक्रारदार भारतात परतल्यावर सेवा पूर्ववत करण्यासह ५ जीबी मधला उर्वरित डेटा वापरण्याची परवानगीही मागितली. मात्र, कंपनीने त्यांची विनंती फेटाळली.
२) तसेच सेवा पूर्ववत करण्यासाठी ६० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याविरोधात तक्रारदाराने ग्राहक सेवा कक्ष, नोडल अधिकारी आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांच्याकडे तक्रार केली.
३) मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ४० दिवस सेवा खंडित केल्यानंतर तक्रारदाराला जीएसटीसह ८६ हजार २९० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर तक्रारदाराने ग्राहक आयोगात तक्रार केली.