मुंबई : ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली’ योजनेमुळे ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल. परिणामी अशा वर्गवारीतील ग्राहकांच्या सबसिडीचा बोजा कमी झाल्याने महावितरणला फायदा होईल. या योजनेच्या वापरासाठी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
महावितरणचा १९ वा वर्धापनदिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी लोकेश चंद्र बोलत होते. ते म्हणाले, महावितरणकडून शेतीसाठी सौरऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे. औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल.
खरेदीत बचत-
१) सौरऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात बचत होऊन सर्वच ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल.
२) पारेषणविरहित सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ८.५ लक्ष कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार असून भविष्यात वीजजोडणीसाठी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही, यासाठी मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना दररोज आठ तास वीजपुरवठा-
१) महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दररोज ८ तास वीजपुरवठा करता येईल.
२) आरडीएसएस योजनेमुळे वीज यंत्रणेचे सक्षमीकरण होऊन विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे.
३) महावितरणचे संचालक अरविंद भादिकर म्हणाले, सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वसुलीवर परिणामकारक तोडगा, वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व वीजहानी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ही कामे करण्यात येत आहेत.