गोराई, कुलवेम भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू; ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:27 AM2024-07-22T10:27:04+5:302024-07-22T10:29:01+5:30
बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडी पलीकडील गोराई व कुलवेम येथील रहिवाशांना अजूनही दूषित पाणीपुरवठा होत आहे.
मुंबई : बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडी पलीकडील गोराई व कुलवेम येथील रहिवाशांना अजूनही दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांचे ऐन पावसाळ्यात शुद्ध पाण्याअभावी हाल होत आहेत.
पालिकेने रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने अनेक ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करताना जलवाहिनीचे नुकसान केले आहे. परिणामी, मुंबई महापालिकेच्या पी उत्तर वॉर्ड ते आर मध्य वॉर्डातील मनोरी, कुलवेम व गोराईपर्यंतच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे, तसेच या भागाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड गॉडफ्रे पिमेंटा यांनी पालिकेकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती.
या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर या दोन विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी गोराई गावाला भेट दिली होती.
... तर वॉर्ड ऑफिसवर धडक देणार-
१) आम्ही पालिका अधिकाऱ्यांना जलवाहिनी कुठे तुटलेली आहे, हे दाखवून दिले. त्यानंतर, त्यांनी फक्त पाहणी केली. मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.
२) त्यामुळे आम्हाला अजूनही दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती गोराई व्हिलेजेर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष स्विस्ती हेन्रीक्स यांनी ‘लोकमत’ला दिली. आम्ही रोज असेच दूषित पाणी प्यायचे का, असा सवाल त्यांनी पालिका प्रशासनाला केला.
३) दरम्यान, दूषित पाण्याची समस्या न सोडविण्यास येथील रहिवासी पालिकेच्या आर मध्य वॉर्ड ऑफिसवर धडक देतील, असा इशाराही हेन्रीक्स यांनी दिला.