Join us

पालिका आणि रेल्वेत समन्वय आवश्यक; ‘आपत्ती व्यवस्थापन’च्या अध्यक्षांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:53 AM

मुसळधार पावसाने सोमवारी मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचले.

मुंबई : मुसळधार पावसाने सोमवारी मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचले. भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी अशा भागांमध्ये पाण्याचा निचरा संथगतीने होत असल्याचे दिसून आले. या भागांत भविष्यात अधिक काटेकोरपणे नियोजन करून पालिकेसह इतर यंत्रणांची पथके आणि यंत्रसामग्री सुसज्ज ठेवण्याच्या सूचना मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडून देण्यात आल्या. 

मुंबई व उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मुंबई पालिका मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. रेल्वेमार्गांवर ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथगतीने होत होता, अशा सर्व ठिकाणी पालिकेचे संबंधित अधिकारी आणि रेल्वेचे संबंधित अभियंते यांनी संयुक्त पाहणी करावी अशा सूचना ही यावेळी देण्यात आल्या.

मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी तसेच मुंबई उपनगराच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख व अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक पार पडली. ज्या भागांत  पाण्याचा निचरा संथगतीने होतो तेथे अधिक पंप बसविणे किंवा अधिक क्षमतेचे पंप बसविणे यांसारख्या उपाययोजना कराव्यात. 

४०० ठिकाणी पंप-

१) महापालिकेकडून शहरात सुमारे ४०० ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत. ते सर्व योग्य प्रकारे कार्यरत असल्याची खातरजमा नियमितपणे करून घ्यावी. 

२) अतिरिक्त मनुष्यबळ, पाणी उपसा करणारे पंप, तसेच पंप नेण्यासाठी टोइंग व्हॅन इत्यादी व्यवस्था तत्पर ठेवावी.

३) अनेक ठिकाणी जनरेटचा वापर पंप चालवण्यासाठी होतो. अतिवृष्टीदरम्यान जनरेटर बंद पडू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन या पंपांसाठी वीज वितरण कंपन्यांकडून थेट ग्रीड कनेक्शन घ्यावे आणि डिझेल जनरेटर हे पर्यायी स्वरूपात कार्यतत्पर ठेवावेत.

४) मुंबईतील रेल्वेसेवा आणि वाहतूकव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला वाहतूक शाखेचे सहआयुक्त अनिल कुंभारे, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अग्निशमन दल, बेस्ट, वीज वितरण कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकारेल्वेपाऊस