Join us  

मुलुंडच्या स्मशानभूमीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? 'लोकमत'च्या बातमीनंतर रहिवाशांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 10:11 AM

Mulund News- मुलुंड स्मशानभूमीचे नूतनीकरण, सुशोभीकरण, इतर कामांसाठी पालिकेने आठ कोटी ४२ लाख ३६ हजार ६७८ रुपयांचे टेंडर काढले होते.

मुंबई :  Mulund News - मुलुंड पूर्वेतील टाटा कॉलनी येथील संयुक्त स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत 'लोकमत'मध्ये मंगळवारी 'उघडे दरवाजे, सापांमुळे भय इथले संपत नाही' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच जागे झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीतील कामांची पाहणी केली.

मुलुंड स्मशानभूमीचे नूतनीकरण, सुशोभीकरण, इतर कामांसाठी पालिकेने आठ कोटी ४२ लाख ३६ हजार ६७८ रुपयांचे टेंडर काढले होते. के. के. इंजिनिअरिंग या कंपनीला हे काम देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने थुकपट्टी लावून नेमके कुठले काम केले? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. तसेच, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

एकाने तक्रार करताच पालिकेकडून हे काम योग्यरीत्या सुरू असल्याचे कळविले होते.कंत्राटदाराने केलेल्या कामाचा पहिल्या पावसातच बोजवारा उडाला आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यालयासह लाकडाच्या वखारीच्या शेडसह इतर ठिकाणी गळती लागली आहे. भिंती ओलसर झाल्या आहेत. त्यात दरवाजे फुगल्याने रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत कर्मचाऱ्यांना कधी दोरी लावून तर कधी जड वस्तू दरवाजात ठेवून रात्र काढावी लागते. अशाच अवस्थेत महिला कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींना लक्ष देण्यास मुहूर्त नसल्याचे दिसून येत आहे.

कंत्राटदाराकडून योग्य काम होत नसल्याने ख्रिश्चन स्मशानभूमीत काही संस्थांनी स्वखर्चाने नूतनीकरण केल्यावर पालिकेच्या 'टी' विभाग कार्यालयाच्या आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावली. कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष करण्यात येत आहे. काम व्यवस्थित सुरू नसल्याबाबत पालिकेकडे तक्रार करताच त्यांच्याकडून काम सुरळीत सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले. कंत्राटदारावर एवढी मेहरबानी का? या कामाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. - अॅड. सागर देवरे, सामाजिक कार्यकर्ता, मुलुंड

गेल्या पावसाळ्यात यापेक्षा भयाण परिस्थिती असताना पालिकेकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर फक्त टेंडर पास करून काम करत असल्याचे दाखवले. मात्र, प्रत्यक्षात काम व्यवस्थित केले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेत संबंधितांवर योग्य कारवाई करून काम करणे गरजेचे आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? - रवी नाईक, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुलुंड