Join us

झटपट लोन अ‍ॅप, ब्लॅकमेलिंग अन् बँक खाते झाले रिकामे; चार महिन्यांत २९ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 11:37 AM

नागरिकांना झटपट लोनच्या नावाखाली लोन अ‍ॅप अथवा व्हॉट्सअ‍ॅप लिंक डाऊनलोड करायला लावण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : झटपट लोनच्या नावाने फसवणुकीचे प्रमाण वेगाने वाढते आहे. गेल्या चार महिन्यांत अशा फसवणुकीचे २९ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी अवघ्या २ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर झटपट लोनसह कोणत्याच आर्थिक आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून आता करण्यात येत आहे.

नागरिकांना झटपट लोनच्या नावाखाली लोन अ‍ॅप अथवा व्हॉट्सअ‍ॅप लिंक डाऊनलोड करायला लावण्यात येते. त्यानंतर मालवेअरद्वारे अ‍ॅंड्रॉइड मोबाइल वा संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. यामध्येही या लिंकवर क्लिक करताच तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील तुमचे सर्व काँटॅक्ट त्यांच्याकडे येतात. त्यामुळे कर्ज घ्या किंवा घेऊ नका, तुमचे फोटो मॉर्फ करून मित्रमंडळींना पाठविण्याची धमकी दिली जाते आणि घेतलेल्या किंवा न घेतलेल्या कर्जाची जबरदस्तीने वसुली केली जाते

त्याचबरोबर अनेकदा बदनामीच्या भीतीने लोकांकडून पैसेही दिले जातात. त्यामुळे अशा लोन अ‍ॅप वा झटपट लोनच्या लिंकपासून लांब राहा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

अशी घ्या काळजी...

१) सर्वांत आधी आपण इन्स्टॉल केलेले लोन अ‍ॅप आणि अनइन्स्टॉल करावे. हे अॅप हे थर्ड पार्टी असल्याने तुमच्या मोबाइलमधील मॅनेज युवर गुगल अकाउंटमध्ये जाऊन त्यातील सिक्युरिटी फिचरमध्ये असलेल्या थर्ड पार्टी अ‍ॅक्सेसमध्ये जाऊन डाऊनलोड केलेले लोन प तिथूनही काढून टाकावे.

२) तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या सर्वाची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करून त्यावर तुमचा फोन हॅक झाला असून, कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटोगॅलरी चोरली असल्याची माहिती त्यांना द्यावी.

३) फोटो मॉर्फ करून मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करत असल्यामुळे असे फोटो उघडू नयेत, असे आवाहनही करावे, तसेच संबंधित क्रमांक रिपोर्ट किंवा ब्लॉक करण्याबाबचा संदेश पाठवावा.

राष्ट्रीयीकृत्त बँक खात्याचा वापर-

सायबर भामट्याकडून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयीकृत बँकाचा आधार घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. मोबाइल बँक खात्यामध्ये केवायसीची जास्त गरज नसल्यामुळे त्यावर अगदी सहजपणे बनावट खाते उघडण्याची पद्धतही या गुन्ह्यांमध्ये वापरली जात आहे, अवघ्या २०० ते ५०० रुपयांत खोटी कागदपत्रे दाखवून ही ठग मंडळी बनावट खाते तयार करत असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसधोकेबाजी