Join us  

मृत्यूनंतर ९ महिन्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; महावितरणच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:48 AM

मुलुंड पोलिसांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह अनधिकृतपणे विद्युत जोडणी घेणाऱ्या चार रहिवाशांविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : मुलुंड कॉलनी येथील सहा वर्षीय अर्णव भंडारे याच्या मृत्यूप्रकरणी मुलुंड पोलिसांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह अनधिकृतपणे विद्युत जोडणी घेणाऱ्या चार रहिवाशांविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे. नऊ महिन्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुलुंड कॉलनीत राहणारे नीलेश धर्मा भंडारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. २९ ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती. अर्णव सकाळपासून मांजरीसोबत खेळत होता. काही वेळातच घराबाहेर आरडाओरडा सुरू झाला. तेव्हा, बाजूच्या भिंतीलगत असलेल्या गल्लीतील गटारात अर्णव पडलेला दिसला. त्याचा डावा हात उघड्या असलेल्या महावितरण कंपनीच्या वायरला चिटकलेला होता. त्याला अग्रवाल रुग्णालयात हलवले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. 

मात्र, महावितरणने निष्काळजीपणे उघड्या ठेवलेल्या वायर आणि स्थानिकांच्या अनधिकृत विद्युत जोडणीमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत भंडारे यांनी चौकशीची मागणी केली.

‘लोकमत’ची भूमिका-

महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मुलुंड येथे सहा वर्षीय चिमुकल्याचा बळी गेला. मुंबईत बेस्ट, टाटा, अदानी आणि महावितरण यांच्या विद्युत वाहक तारांचे जाळे आहे.  अनेक ठिकाणी तारांच्या डीपी उघड्या असतात. त्याचे कव्हर तुटून पडलेले असते. केबलच्या बाहेरही वेड्यावाकड्या गेल्याचे असंख्य ठिकाणी पाहायला मिळते. अधिकाऱ्यांच्या आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ज्यांचे हकनाक जीव जातील त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी कोणी घ्यायची? महापालिका, महावितरण आणि वीज पुरवठा करणाऱ्या सगळ्यांनी आपली यंत्रणा फुटपाथच्या कडेला किंवा ज्या ज्या ठिकाणी उघडी पडलेली आहे ती तातडीने दुरुस्त केली पाहिजे. नाहीतर अशा दुर्घटना झाल्यास केवळ त्या भागातल्या अधिकाऱ्यांवर नाही तर या ठिकाणच्या वरिष्ठांवरही गुन्हे दाखल का करू नयेत...?

मुलुंड पोलिसांनी विद्युत-

मुलुंड पोलिसांनी विद्युत जोडणीचे निरीक्षण होऊन अहवाल मागवला. यात, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी केबल हे नियमानुसार जमिनीखालून न घेता या केबलला तात्पुरता जोड दिला. ते उघडे जमिनीवरून टाकून त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. त्यातून विद्युतचोरी केलेल्या स्थानिकांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला असावा, असा अहवाल दिला आहे.

वीजचोरांवरही कारवाई-

महावितरण कंपनीच्या मुलुंड शाखेचे कामकाज पाहणारे अधिकारी सहायक अभियंता गोकुळ सुधाकर पवार (३९), वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र अरविंद साळवे (५२) यांनी हे काम केल्याचे समोर आले. जयशास्त्रीनगर येथील रहिवासी सचिन महादेव बोदडे (२६), सोपान प्रल्हाद बोदडे (४६), अर्जुन महादेव बोदडे (३२), जनाबाई दौलत सोनव (५०) यांनी केबलच्या जोडणीला छेडछाड करून अनधिकृतपणे विद्युत जोडणी करून विद्युतपुरवठा घेऊन केबल उघडी ठेवल्याचे समोर आले. या रहिवाशांविरुद्ध महावितरण विभागाने वीजचोरीची कारवाई देखील केली. त्यामुळे पवार आणि साळवे या महावितरण अधिकारी आणि अनधिकृतपणे विद्युतपुरवठा घेणारे रहिवासी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईमुलुंडमहावितरणगुन्हेगारीवीज