Join us

‘त्या’ खात्यांत कोट्यवधींचे व्यवहार, मानवी तस्करी प्रकरण; मैत्रिणी, नातेवाइकांच्या खात्याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 10:37 AM

मानवी तस्करी प्रकरणात अटक नौदल अधिकारी ब्रह्म ज्योती, विपीन कुमार डागर यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार आढळले आहेत.

मुंबई : मानवी तस्करी प्रकरणात अटक नौदल अधिकारी ब्रह्म ज्योती, विपीन कुमार डागर यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार आढळले आहेत. यामध्ये ब्रह्म ज्योती हा मैत्रीण सिमरन तेजी हिच्या नातेवाइकांच्या बँक खात्याचा वापर करीत होता. या खात्यात एक कोटीहून अधिक रकमेचे व्यवहार केल्याचे दिसून आले.

गुन्हे शाखेने या कारवाईत आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. सब-लेफ्टनंट ब्रह्म ज्योती आणि लेफ्टनंट डागर हे दोघेही वर्गमित्र आहेत. सिमरन,  रवी कुमार आणि दीपक मेहरा ऊर्फ डोगरा यांना बेड्या ठोकल्या असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशाचे व्यवहार झालेले दिसून येत आहे. सिमरन आणि तिच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात एक कोटीचा व्यवहार झाल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले.  याबाबत गुन्हे शाखा अधिक चौकशी करीत आहे. ब्रह्म ज्योतीच्या एका बँक खात्यात ४०, तर डागरच्या बँक खात्यात ४० लाखांचे व्यवहार मिळून आले. अन्य बँक खात्यांचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे. यातून या टोळीने कोट्यवधींची कमाई केल्याचा अंदाज असून, त्यानुसार बँक खाते तपासण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या तपासात ब्रह्म ज्योतीच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.

आंध्र प्रदेशमधून खरेदी केली स्टॅम्प पेपर मशीन-

ब्रह्म ज्योतीच्या सांगण्यावरून डागरने विशाखापट्टणम येथून स्टॅम्प बनविण्याची मशीन व त्याकरिता लागणारे रबर खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी डागरकडून मशीन जप्त केली आहे. त्याच्यासह १०८ रबरी स्टॅम्प,१४ भारतीय पासपोर्ट हस्तगत केले आहेत. ब्रह्म ज्योती याचे ५ ई-मेल मिळून आले आहे. याच ई-मेल आयडीवरून गुन्ह्यात वापरण्यात आलेले नाशिक डेंटल क्लिनिकचे लेटर हेड, स्टॅम्प सर्व डाऊनलोड केल्याचे दिसून आले. या ई-मेलचाही तपास सुरू आहे.

तो गुन्ह्यातील रक्कम सिमरनच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात वळती करण्यास सांगत होता. या बँक खात्याचा वापर ब्रह्म ज्योती करीत असल्याचेही तपासात समोर आले. या बँक खात्यांना ब्रह्म ज्योतीचाच मोबाइल क्रमांक संलग्न आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत. दीपक हा दक्षिण कोरियात रोजगारासाठी पाठविण्याच्या नावाखाली पैसे स्वीकारत होता. पुढे हे पैसे आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्सफर होत होते.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसमानवी तस्करी