लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायबरच्या १९३० हेल्पलाइनमुळे कोट्यवधी रुपये खात्यात रिटर्न आले आहे, तसेच मुंबई सायबर पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्यांचे सुमारे एक हजार मोबाइल क्रमांक ब्लॉक केले आहे. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईत सायबर गुन्ह्यांचे १७६० गुन्हे दाखल झाले असून ४१० जणांना अटक करण्यात आली आहे. १९३० हेल्पलाइनने ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांकडून गमावलेल्या रकमेपैकी ६७.२ कोटी परत मिळविण्यात यश आले आहे.
या हेल्पलाइनमुळे दिवसाला ६० ते ७० लाख वाचविण्यात यश येत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. विविध फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक हजार क्रमांक ब्लॉक करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. अनेकदा विविध घटनांमध्ये एकाच मोबाइल क्रमांकाचा वेगवेगळ्या व्यक्तींना फसवण्यासाठी वापर केल्याचेही समोर आले. खऱ्या टेलिकॉम ग्राहकांच्या कागदपत्रांचा आणि तपशीलांचा सीम कार्ड मिळविण्यासाठी गैरवापर केला जाऊ शकतो जे नंतर फसवणूक करणाऱ्यांना विकले जातात, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. मोबाइल क्रमांकांसोबत, सायबर पोलिस आयएमईआय क्रमांकदेखील ब्लॉक करण्यासाठी दूरसंचार विभागाला पाठवू शकतात. यामुळे फसवणूक करणाऱ्याचे ऑपरेशन अधिक कठीण होईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
राष्ट्रीयीकृत बँक खात्याचा वापर-
सायबर भामट्याकड़ून राष्ट्रीयीकृत बँकांचा आधार घेतल्याची माहिती सायबर पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे, मोबाइल बँकिंगमध्ये केवायसीची गरज नसल्यामुळे बनावट खाते तयार केले जाते. २०० ते ५०० रुपयांत कागदपत्राचा फोटो घेत ठग मंडळी बनावट खाते तयार करत आहे.
गोल्डन अवर्सच्या संपर्कांनंतर असे होते काम-
तक्रारदाराने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यास सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. त्यानुसार, ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तात्काळ फ्रीज्ड करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात.