लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने धडकी भरली असतानाच, देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच सर्व रुग्णालयांचे मॉकड्रिलही नुकतेच झाले. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर आता गर्दी होऊ लागली आहे, परंतु कोविशिल्ड लसीचा साठा नसल्याने लाभार्थ्यांना माघारी जावे लागत आहे.
सध्या पालिकेकडे कोव्हॅक्सिन लसीचा साठा शिल्लक आहे, परंतु कोविशिल्ड लसीच्या साठ्याच्या मागणीसाठी पालिकेने केंद्राला साकडे घातले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी प्रशासनाने लसीच्या साठ्याची तरतूद केली होती. मात्र, सामान्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने लससाठा अक्षरशः वाया गेला.
घाबरू नका, योग्य काळजी हाच उपाय
चीनमधील बीएफ-७ हा विषाणू राज्यासाठी घातक नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी घाबरून जाऊ नये. सॅनिटायझरचा वापर, मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीने संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळे सामान्यांनी लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. समाज माध्यमांवरील कोरोनाविषयी कोणत्याही अपमाहितीला बळी न पडता अधिकृत बाबींवर विश्वास ठेवावा. - डॉ.अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष (महाराष्ट्र), आयएमए
अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी घ्यावी खबरदारी
गर्भवती, सहव्याधीग्रस्त, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी बाळगली पाहिजे. या गटातील व्यक्ती संसर्गाला पटकन बळी पडू शकतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळायला हवे. याखेरीज आवश्यकता भासल्यास कोविड वर्तणुकीचे नियम पाळावेत. देशात ९५ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे, अनेकांनी बूस्टरही घेतला आहे. त्यामुळे या विषाणूला वा भविष्यातील संसर्गाच्या चढ-उताराला घाबरण्याची गरज नाही. कोरोना लाटांच्या नियंत्रणाचाही सक्षम अनुभव आपल्याकडील यंत्रणांकडे आहे, त्यामुळे सामान्यांनी बेफिकीर न राहता केवळ नियम पाळावेत. - डॉ. अविनाश सुपे, राज्य कोरोना कृती दल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"