लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सजली असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला रंगीबेरंगी फुलापानांची आरास करण्यासाठी भाविकांनी दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. बुधवारपासून दादरचे फुलमार्केट गर्दीने फुलून गेले असून, गुरुवारी येथे मोठी लगबग होती. शुक्रवारी तर दादरच्या फुलमार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नसेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे असून, पुढील दहा दिवसांत खरेदी-विक्रीला उधाण येणार आहे. येत्या दहा दिवसांत दादरच्या फुलमार्केटमध्ये २०० कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दादरच्या फुलमार्केटमध्ये रोज १०० ते १५० ट्रक येतात. १५० ते २०० पिकअप व्हॅन येतात. सर्वसाधारण रोज ३०० हून अधिक गाड्या येथे येतात. दिवसाच्या ३०० गाड्या म्हटले, तरी दहा दिवसांच्या सुमारे ३ हजार किंवा त्याहून अधिक गाड्या भरून फुले येतील. - सदानंद मंडलिक, व्यापारी
पुणे जिल्ह्यातून फुलांची आवक होते. शिवाय सातारा, सांगली या जिल्ह्यांतूनही फुले येतात. सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यातून फुले येतात. तासगाववरून गुलाब येतात. मावळ तालुक्यातून कट फ्लॉवर येतात. नाशिकवरूनही फुले येतात. - गणेश मोकल, व्यापारी
ठाण्यातून विक्रेते दाखल-
१) ठाणे जिल्ह्यातून अनेक महिला आंब्याची डहाळी, बेल, दूर्वा हे साहित्य विकण्यासाठी येथील बाजारात दाखल होतात.
२) रोज सुमारे हजार महिला फुलापानांची विक्री करतात. शिवाय गणपतीच्या पुजेसाठी लागणारी फळांचीही या महिलांकडून विक्री केली जाते.
दिवसाला २० कोटी-
१) दादर परिसरात साडेसहाशेहून अधिक दुकाने असून, दहा दिवसांत एका दुकानाचा सुमारे दहा लाखांचा व्यवसाय होतो.
२) सर्वसाधारणपणे दिवसाला २० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.