Join us  

दहिसर-भाईंदर लिंक रोड रखडला; महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून परवानग्यांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:36 AM

मुंबई पालिका प्रशासनाने कार्यादेश देऊन महिने उलटले तरी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे काम रखडले आहे.

मुंबई :मुंबई पालिका प्रशासनाने कार्यादेश देऊन महिने उलटले तरी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे काम रखडले आहे. मुंबई शहरातून मीरा-भाईंदर व वसई-विरार शहरात जाण्यासाठी दहिसर ते भाईंदर लिंक रोड हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. तसेच तो भविष्यात शहराची वाहतूक कोंडी फोडणारा ठरणार आहे. 

हा लिंक रोड सुरू झाल्यानंतर दहिसर ते मीरा-भाईंदरचे अंतर केवळ १० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. मात्र, यासाठी पर्यावरण विभाग, वनविभाग, महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन, मेरीटाईम बोर्ड, अशा महत्त्वाच्या प्राधिकरणाच्या परवानग्या आवश्यक आहेत. त्याशिवाय प्रकल्पाला सुरुवात होऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.

दहिसर ते मीरा-भाईंदरपर्यंत लिंक रोड बनवण्याचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीला मिळाले आहे. दहिसर ते भाईंदरदरम्यान ५.३ किमी लांबीचा लिंक रोड बनवण्यासाठी पालिका एक हजार ९८१ कोटी रुपये खर्च करणार आहे. कार्यादेश जारी केल्यानंतर ४२ महिन्यांत कंपनीला हा रस्ता पूर्ण करावा लागणार आहे. 

दोन महिन्यांचा कालावधी लागणार-

दहिसर ते मीरा-भाईंदरपर्यंत लिंक रोडसाठी सर्व आवश्यक परवानग्या लागणार आहेत. तसेच मीरा-भाईंदर पालिका परिसरात लिंक रोड रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित नसल्याने तसे बदल विकास आराखड्यात करून घ्यावे लागणार आहेत. या सर्व प्रक्रियांना अद्याप पुढील दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभाल-

१) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असणार आहे. या प्रकल्पांतर्गत दहिसर खाडीमध्ये १०० मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे.

२) एकूण ५.३ किलोमीटर लांब एलिव्हेटेड रोडसाठी एकूण ३३० खांब उभारण्यात येणार आहेत. दररोज जवळपास ७५ हजार वाहने या लिंक रोडचा वापर करतील, असा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकादहिसररस्ते वाहतूकमीरा-भाईंदर