Join us  

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:12 AM

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेला येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेला येत आहे. सध्या या मार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षात ही मेट्रो मार्गिकाही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची चिन्हे आहेत.

पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडून दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी १३.६ किमी असून त्यावर १० स्थानके असतील.

यापूर्वी या मेट्रो मार्गिकेचे शेवटचे स्थानक मीरा-भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम हे होते. मात्र, या मेट्रोचे कारशेड उत्तन येथे गेल्याने आणखी दोन स्थानकांची भर पडली आहे. ‘एमएमआरडीए’ने दहिसर ते सुभाषचंद्र बोस स्टेडियमदरम्यानच्या मार्गाचे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत.

कारशेडला  सुरुवात नाही-

अद्याप कारशेडच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ‘एमएमआरडीए’ने नुकतीच कंत्राटदारची नियुक्ती केली आहे. मात्र, हे कारशेड उभारण्यासाठी जवळपास सव्वाचार वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर चारकोप येथील कारशेडमधून या मेट्रो मार्गावर गाड्या धावण्याची चिन्हे आहेत.

 कारशेड बांधण्याचे कंत्राट ७०१ कोटींचे -

मेट्रो ९ मार्गिकेच्या उत्तनजवळील डोंगरी येथे कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमएमआरडीए’ने नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ऋृत्विक प्रोजेक्ट आणि सोमा या कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीत कारशेड उभारणीसाठी कंत्राट देण्यास मान्यता दिली आहे. या कंपनीला ७०१ कोटी रुपयांना हे कंत्राट देण्यात आले असून, निविदेतील रकमेपेक्षा ७५ कोटी रुपये अधिक किमतीला काम देण्यात आले आहे.

१) मेट्रो ९ मार्गिका : लांबी - १३.६ किमी, स्थानके : १० 

२) कारशेड उभारणीसाठी खर्च - ७०१ कोटी रुपये

टॅग्स :मुंबईमेट्रोदहिसरएमएमआरडीए